अभिनय आणि मादक अदांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केरळ पोलिसांकडून सध्या सनी लिओनीची चौकशी सुरु आहे. एका कार्यक्रमासाठी सनीने लाखो रुपये घेतले होते. मात्र, त्या कार्यक्रमासाठी गैरहजर राहिल्यामुळे तिची चौकशी करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी शुक्रवारी सनीची चौकशी झाली असून कार्यक्रमाच्या आयोजकांनी सनी लिओनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री सनी लिओनीला केरळमधील कोच्ची येथे दोन कार्यक्रमांसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यासाठी सनीने कार्यक्रमाच्या आयोजकांकडून लाखो रुपयांचा अॅडव्हान्सदेखील घेतला होता. मात्र, ऐनवेळी सनी या कार्यक्रमाला गैरहजर राहिली. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सनीने या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आयोजकांकडून २९ लाख रुपये अॅडव्हान्समध्ये घेतले होते.

आरोपांवर सनी लिओनीचं स्पष्टीकरण

कार्यक्रमाच्या आयोजकांनी आरोप केल्यानंतर सनी लिओनीने त्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. करोना काळ सुरु असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. तसंच आयोजकांकडून या कार्यक्रमात ५ वेळा बदल करण्यात आला. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी २९ लाख नव्हे तर, १२ लाख रुपये घेण्यात आले होते. जे लवकरच परत करण्यात येतील,असं स्पष्टीकरण सनी आणि तिच्या वतीने एका व्यक्तीने दिलं आहे.