sunny-arbaz

रुपेरी पडद्यावर अल्लड भूमिका साकारत केवळ आकर्षक दिसण्यावर भर देणारी सनी लिओनी लवकरच राजीव वालिया यांच्या ‘तेरा इंतजार’ या आगामी चित्रपटात भावनात्मक आणि उत्कट भूमिका साकारण्याचे आव्हान पेलताना दिसणार आहे. या संगीतमय थरारपटात वाट्याला आलेली ही भूमिका साकारण्यासाठी ती सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, चित्रीकरण सुरू होण्याआधी तिने एका कार्यशाळेत प्रशिक्षणदेखील घेतले.

हरवलेल्या अरबाज खानचा शोध घेणाऱ्या सनीला रडू कोसळते चित्रपटात असे एक दृश्य आहे. या भावूक दृश्यासाठी तिला डोळ्यातून अश्रू गाळणे गरजेचे होते. सर्वसाधारणपणे अशी दृश्ये चित्रीत करताना ग्लिसरीनचा वापर केला जातो. सनीसाठीदेखील अशीच व्यवस्था चित्रीकरणाच्या ठिकाणी करण्यात आली होती. सेटवर उपस्थित असलेला चमू हातात ग्लिसरीनची बाटली घेऊन सज्ज होता. हे आव्हानात्म दृश्य साकारणे सनीला सोपे जावे म्हणून दिग्दर्शत राजीव वालिया यांनी सनीला ग्लिसरीन वापरण्याचा सल्ला दिला. परंतु, आपल्यातील अभिनय क्षमतेला आव्हान देत तिने ग्लिसरीनच्या वापरास चक्क नकार दिला. सनीने चित्रपटातील ते पात्र इतके आत्मसात केले की तिला नैसर्गिकपणे रडू कोसळले आणि सहज अभिनय करत उत्तम दृश्य साकारले. सनीचा नैसर्गिक अभिनय पाहून सेटवरील सर्वजण अवाक झाले. दु:खाची छटा असलेले भावनात्मक दृश्य सनीने लिलया पार पाडल्याचे पाहून दिग्दर्शक राजीव वालियादेखील आश्चर्यचकीत झाले. आत्तापर्यंत सनी आकर्षक रुपाबरोबरच तिच्या अल्लड भूमिकांसाठी ओळखली जात होती, परंतु यावेळी तिने आपल्यातील अभिनय क्षमता दाखवून देत सेटवरील सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

‘बागेश्री फिल्मस’च्या ‘तेरा इंतजार’ चित्रपटाच्या हैदराबादमधील चित्रीकरणादरम्यान हे सर्व घडले. चित्रीकरण्याच्या या टप्प्यात अनेक भावूक आणि उत्कट दृश्ये ‘रामोजी राव सिटी’मध्ये चित्रीत करण्यात आली. सनी अतिशय मेहनती आणि कामाप्रती समर्पणाची भावना असणारी अभिनेत्री असल्याचे सांगत, स्वत:चे समाधान होईपर्यंत ती रिटेक देत असल्याची माहिती दिग्दर्शक राजीव यांनी दिली. संक्षिप्त रुपात तिला चित्रपटाची कथा ऐकविल्यानंतर व्यक्तीरेखा आत्मसात करण्यासाठी तिने कार्यशाळा लावण्याचा निर्णय घेतला. याआधी तिने असे कधीही केले नव्हते. सनी आणि अरबाज खानमुळे आपल्यासाठी गोष्टी खूप सोप्या झाल्याचे मनोगत दिग्दर्शक राजीव वालिया यांनी व्यक्त केले.

चित्रपटात आर्य बब्बर, सलिल अंकोला, सुधा चंद्रन इत्यादींच्यादेखील भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अनवर खान यांची असून, पटकथा राजीव वालिया यांनीच लिहिली आहे. चित्रपटाला संगीत राजा अशू यांचे आहे, तर गाण्यांचे बोल शब्बीर अहमद यांचे आहेत. ‘तेरा इंतजार’ हा संगीतप्रधान ‘रोमँटिक थ्रिलर’ चित्रपट आहे. वीर (अरबाज खान) नावाचा चित्रकार आणि चित्रांच्या विक्री व्यवसायात असलेली रौनक (सनी लिओनी) यांच्यातील प्रेमसंबंधांभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. जीवनात सर्वकाही सुरळीत सुरू असताना, अचानक एक दिवशी वीर हरवतो आणि रौनकच्या जीवनात उलथापालथ होते. आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी रौनक सर्वतोपरी प्रयत्न करते. दर्शकांना खिळवून ठेवणारी अनेक अनपेक्षीत वळणं आणि घडामोडी चित्रपटात असल्याचे सांगितले जाते.