अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच तिने एक चित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या चित्रामुळे सनीवर चोरीचा आरोप केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी सनीने एक चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे चित्र तिने स्वत: काढल्याचा दावा केला होता. तसेच या चित्राला विकल्यानंतर मिळणारे पैसे ती कर्करोग ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी देणार होती. मात्र हे चित्र मलिका फावरे नावाच्या चित्रकाराचे असून तिने या चित्राची नक्कल केल्याचा आरोप डाएट सब्या या इंस्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आला आहे.

डाएट सब्याने इंस्टाग्रावर एक पोस्ट लिहून सनीवर टीका केली आहे. “एखाद्या कलाकाराची मेहनत त्याची परवानगी न घेता चोरणे हे दुष्कृत्य (Dirty) आहे.” अशी पोस्ट डाएट सब्याने शेअर केली आहे. या पोस्टमुळे सनीला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे.

चोरी केल्याचा आरोप झाल्यानंतर सनीने सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. ‘मी कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही. मला ते चित्र खुप आवडले त्यामुळे ते पुन्हा एकदा मी रेखाटले. या चित्राच्या लिलावातून येणारे पैसे कर्करोगग्रस्तांना देण्यात येणार आहे. कोणालाही माझे चित्र आवडले नसेल तर मला माफ करावे” अशी प्रतिक्रीया सनीने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना दिली आहे.