‘मेरे पास माँ है..’ शशी कपूरने ‘दीवार’ चित्रपटात ज्या अभिमानाने हा संवाद म्हटला असेल त्यापेक्षा काकणभर जास्तच अभिमानाने सनी लिऑनने बॉलीवूडमधील तमाम अभिनेत्रींना ‘माझ्याकडे सात चित्रपट आहेत’ असं ठणकावून सांगितलं आहे. ‘पॉर्न स्टार’ म्हणून असलेली आपली प्रतिमा पुसली जावी यासाठी हरएक प्रयत्न करणाऱ्या सनी लिऑनने हिंदी चित्रपट करण्याचा एकच धडाका लावला आहे. मात्र, हे चित्रपट करत  असताना आपल्या भूमिकांमध्येही वेगळेपणा असावा, असा तिचा आग्रह आहे. सनी लिऑनचा ‘एक पहेली लीला’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. बॉबी खान दिग्दर्शित ‘एक पहेली लीला’मध्ये सनी लिऑन दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘जिस्म २’ या चित्रपटातून सनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण के ले. त्यानंतर एकापाठोपाठ एक ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘हेट स्टोरी २’ अशा हिंदी चित्रपटांमधून काम केलेल्या सनीला आपल्यावरचा ‘पॉर्न स्टार’ हा शिक्का पुसायचा आहे. त्यामुळे वेगळे चित्रपट करायच्या प्रयत्नात असलेल्या सनीला ‘एक पहेली लीला’ हा चित्रपट मिळाला. दुहेरी भूमिका असलेला हा चित्रपट आपल्या कारकीर्दीला चांगले वळण देणारा चित्रपट ठरेल, असा विश्वास सनीला वाटतो आहे. या चित्रपटात मीरा आणि लीला अशा दोन भूमिका ती साकारते आहे. मीरा ही लंडनस्थित मॉडेल आहे तर लीला ही अगदी पारंपरिक विचारांची राजस्थानी तरुणी आहे. या दोन भूमिका आजवर आपल्याला मिळालेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळ्या होत्या. ‘जिस्म २’ असेल किंवा ‘रागिनी एमएमएस २’ असेल या दोन्ही चित्रपटांतील भूमिका कुठेतरी तिच्या बोल्ड प्रतिमेशी मिळत्याजुळत्या होत्या. ‘एक पहेली लीला’ या चित्रपटात प्रेक्षकांना माझा एकदम वेगळा लुक पहायला मिळेल. आत्तापर्यंत मी जे चित्रपट केलेत त्यापेक्षा हा चित्रपट वेगळ्या जॉनरचा आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करताना जास्त आनंद झाला आहे, असे सनीने सांगितले.
मीरा आणि लीला या दोन भूमिकांमध्ये राजस्थानी लीलाची व्यक्तिरेखा साकारणं आपल्यासाठी खूप अवघड होतं, असं सनी म्हणते. मीरा ही लंडनहून आलेली मॉडेलिंग करणारी तरुणी आहे. वास्तव आयुष्यात मीही परदेशात राहून मॉडेलिंग केलेलं असल्याने मीराची भूमिका माझ्यासाठी अजिबातच वेगळी नव्हती. मात्र, लीला ही मीराच्या पूर्वजन्मीची व्यक्तिरेखा आहे. त्यासाठी पारंपरिक घागरा- चोली घालायची, लीलाच्या मेकअपसाठी मला तीन तास लागायचे. एवढा मेकअप करून राजस्थानच्या वाळवंटात ४० ते ५० डिग्री सेल्सिअस तापमानात चित्रीकरण करायचे. तो मेकअप सतत उतरायचा. मग पुन्हा मेकअप करा, सतत पाणी प्या आणि चित्रीकरण झाल्यावर तो मेकअप उतरवायलाही तीन तास लागायचे. इतक्या मेहनतीने लीलाची भूमिका आपण रंगवली असल्याचे सनीने सांगितले. मात्र, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या मेहनतीने आगळा आनंद मिळाल्याची कबुलीही सनीने दिली. हा चित्रपट करताना आणखी एक आव्हान आपल्यासमोर होते ते म्हणजे भाषेचे असे सनी सांगते. लीला राजस्थानी असल्यामुळे त्याच भाषेत संवाद म्हणायचे. जिथे मला अजून हिंदी बोलता येत नाही तिथे राजस्थानी भाषेत बोलणं ही माझ्यासाठी परीक्षा होती. कॅनडात लहानाची मोठी झाल्याने इंग्रजीचा प्रभाव, पंजाबी कुटुंबातील असल्याने घरात पंजाबी भाषेतून होणारा संवाद यामुळे हिंदी बोलण्याचा कधी संबंध आला नाही, असं तिने सांगितलं. सध्या ती स्वत:च्या टीमबरोबर हिंदीत बोलते. मात्र हिंदी पक्कं होण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागणार असल्याचं ती सांगते.
‘एक पहेली लीला’ या चित्रपटात रजनीश दुग्गल आणि जय भानुशाली या दोघांबरोबर तिने काम केलं आहे. शिवाय, तिने या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चनवर चित्रित झालेल्या ‘ढोली तारो’ या गाण्यावरही नृत्य केलं आहे. या गाण्यावर नृत्य करताना खूप मजा आल्याचे सांगणाऱ्या सनीला तिची ऐश्वर्याबरोबर केली जाणारी तुलना मात्र सहन होत नाही.