आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट शुक्रवारी (१२ जुलै) प्रदर्शित झाला. कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आनंद कुमार संघर्ष करत राहिले. त्याचा हाच जीवनप्रवास ‘सुपर ३०’मधून उलगडण्यात आला आहे. हृतिक रोशन याची मुख्य भूमिका असलेल्या हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने एकूण ८८.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

‘सुपर ३०’ने पहिल्या दिवशी ११.८३ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी १८ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २०.५० कोटी रुपये, चौथ्या दिवशी ७ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ६.५० कोटी रुपये, सहाव्या दिवशी ६.२५ कोटी रुपये, सातव्या आणि आठव्या दिवशी अनुक्रमे ५.६२ कोटी रुपये, ४.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, ‘सुपर ३०’ या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असून आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.