30 September 2020

News Flash

चित्र रंजन : वास्तवाची नाटय़मय मांडणी

एका छोटय़ाशा गावातील हा हुशार तरुण आपल्या गणिती ज्ञानाच्या बळावर पुढे जाऊ पाहतो आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

सुपर ३०

बिहारमध्ये जिथे शिक्षणाची दुकानेच्या दुकाने गल्ल्यागल्ल्यांमधून वसलेली आहेत, अशा ठिकाणी आपल्या हुशारीने गरिबीमुळे शिक्षण न परवडणाऱ्या मुलांना आयआयटी जेईईसारख्या परीक्षांची कवाडे उघडी करून देणाऱ्या प्राध्यापक आनंद कुमारची कथा मुळातच धाडसी आहे. हे धाडस फक्त शिक्षण माफियांच्या विरोधात उभे राहण्याचे नाही. तर आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर चांगले घरदार, सुखसोयी, समाजातील प्रतिष्ठा हे सगळे मिळवणे सहजशक्य असताना ते नाकारून आपल्यासारख्या गरीब मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचे सामथ्र्य मिळवून देण्यासाठी धडपडण्याचा निर्णय घेणे हे मोठे धाडस होते. त्यांचा तो धाडसी निर्णय आणि मुलांना आयआयटी-जेईईपर्यंत आणून सोडण्यापर्यंतचा प्रवास हा या चित्रपटाचे प्रेरणास्थान आहे. मात्र एकीकडे आनंद कुमार यांचा चरित्रपट नसला तरी वास्तव कथा मांडताना दिलेली नाटय़मय फोडणी जास्त झाली आहे..

एका छोटय़ाशा गावातील हा हुशार तरुण आपल्या गणिती ज्ञानाच्या बळावर पुढे जाऊ पाहतो आहे. पाटण्यात सुसज्ज ग्रंथालय नाही म्हणून मैलोन्मैल पायपीट, रेल्वेचा प्रवास करून वाराणसीत येऊन मिळेल त्या पद्धतीने संदर्भग्रंथांमधून स्वत:च अभ्यास करत महाविद्यालयातून सुवर्णपदक जिंकणारा हा तरुण आनंद कुमार. ज्या ठिकाणी तो जन्माला आला आहे तिथे जातीवरून, आर्थिक परिस्थितीवरून होणारा भेदाभेद मोठा आहे. त्याचा उल्लेख चित्रपटात अनेक ठिकाणी येतो. मात्र तेथील मानसिकतेचा मुख्य भाग हा या जातीभेदाने व्यापलेला आहे, त्यामुळेच क्षमता असूनही या मुलांना शिक्षण घेण्यासाठी सुविधा मिळत नाहीत. मजुराच्या मुलाने मजूरच राहिले पाहिजे आणि राजाच्या मुलाने राजाच झाले पाहिजे, अशी धारणा असलेल्या या समाजात शैक्षणिक प्रगतीचा जो फुगवटा आहे तो या राजकीय नेत्यांच्या शिक्षणसंस्था-कोचिंग क्लासेस यांनी निर्माण के लेला आहे. आर्थिक क्षमतेच्या जोरावर, सत्ता हातात असलेला एक छोटा वर्ग एका मोठय़ा वर्गातील लोकांना शिक्षणासारखा मूलभूत अधिकार नाकारतो, हे वास्तव आहे. या वास्तवाचे चटके खाल्ल्यानेच केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळूनही तिथे पोहोचू न शकलेल्या आनंद कुमार यांनी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न महत्त्वाचा ठरतो. चित्रपटात आनंदला त्याचा भाऊ प्रणव आणि आई-वडील यांचा खूप मोठा पाठिंबा आहे. पोस्टखात्यात क्लर्क असलेले आनंदचे वडील हे त्याच्या शिक्षणासाठी आग्रही असतात. मात्र तरीही आनंद यांचा प्रवास ‘सुपर ३०’ पर्यंत कसा येऊन पोहोचतो, ‘सुपर ३०’ हे नेमके काय आहे, आनंद कुमार यांनी ‘सुपर ३०’ हा शिकवण्याचा एक पॅर्टन विकसित केला होता. त्याची थोडीशी झलक चित्रपटात दिसते मात्र मुळात हा विचार काय होता? मुलांना व्यावहारिक दृष्टिकोनातून शिक्षणाची सफर घडवण्याचा विचार त्यांच्या मनात आलाच कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपटातून हवी असतात. मात्र त्या महत्त्वाच्या मुद्दय़ांना स्पर्श करून चित्रपट पुढे सरकतो.

ज्याचा शिक्षणावर खरा हक्क आहे, त्याला शिक्षण मिळालेच पाहिजे, हे वारंवार या चित्रपटात सांगितले गेले आहे. किंबहुना, त्याच उद्देशाने आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी ‘सुपर ३०’ हा पॅटर्न विकसित केला. मात्र चित्रपटात ते एकमेव उद्दिष्ट असल्यासारखाच आनंद कुमार यांचा वावर दिसतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचा दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग कसा केला पाहिजे, या विचारातून अभ्यास शिकवणारे प्राध्यापक आनंद कुमार म्हणूनच तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्याला हे करायचे आहे, याचा त्यांच्या आयुष्यात आलेला साक्षात्काराचा क्षण हा कसा होता, हे नेमके कळत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध आनंद कुमार यांच्या जडणघडणीत आणि उत्तरार्ध ‘सुपर ३०’च्या कथेसाठी खर्ची पडला आहे. त्यातही ‘सुपर ३०’ची कथा दाखवताना या सगळ्यांचे आपापसातील बाँडिंग, त्या मुलांचा शिकण्याचा प्रयत्न याच्यापेक्षा तथाकथित क्लास संचालक किंवा शिक्षणमंत्री आपल्याला कधीकाळी संकट ठरू शकेल, अशा या फॉम्र्युल्याला आणि त्याच्या कर्त्यांला मिटवण्याचा कसा प्रयत्न करतात, या त्याच त्याच कथेवर जास्त केंद्रित झाला आहे. त्यातही ज्या फिल्मी पद्धतीने ही मुले अखेरची लढाई लढतात, तेही वास्तवाला धरून वाटत नाही. एकीकडे आत्मविश्वासाने फॉम्र्युला सोडवणाऱ्या या मुलांना इंग्रजी भाषाच येत नाही, त्यांना केवळ हिंदीच कळते, हाही प्रकार सहजी पचनी पडत नाही. तरीही आनंद कुमार यांचे वडिलांशी असलेले नाते, त्यांच्या भावाचे सावलीसारखे त्यांच्याबरोबर असणे, मुलांबरोबरचे काही प्रसंग असे मोजके प्रसंगच लक्षात राहतील इतके प्रभावी ठरले आहेत.

आनंद कुमारांच्या भूमिकेसाठी हृतिकची केलेली निवड अजूनही लोकांच्या पचनी पडलेली नाही. हृतिक हा देखणा आणि तितकाच सक्षम अभिनेता आहे. मात्र आनंद कुमार हे व्यक्तिमत्त्व अगदी त्याच्या उलट आहे. अशावेळी हृतिकलाच घेऊन पुढे जायचे तर प्रभावी मेकअपचा वापर हवा होता. एक अभिनेता म्हणून त्याने देहबोली बदलत, संवादफेकीच्या आधारे आनंद कुमार साकारण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे. मात्र त्याच्या चेहऱ्याला केवळ रंग फासत त्याला लूक द्यायचा केलेला प्रयत्न चांगलाच फसला आहे. जवळपास पावणेतीन तासाची लांबी असलेल्या या चित्रपटात ज्या ‘सुपर ३०’ फॉम्र्युल्यावर हा चित्रपट बेतलेला आहे, त्याची कथा उत्तरार्धानंतर वेगाने सरकते. हा दोष कलाकारांचा नसून हे दिग्दर्शक म्हणून विकास बहल यांचे अपयश आहे. अनेक ठिकाणी आनंद कुमार यांच्या मूळ कथेत उगीचच नाटय़ घुसडून त्याला सुपर करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो सातत्याने जाणवतो. आणि त्यामुळेच त्या चित्रपटाचा प्रभाव मर्यादित झाला आहे. वर म्हटल्याप्रमाणे आनंद कुमार यांची आणि त्यांच्या ३० विद्यार्थ्यांची कथा ही प्रेरणादायीच आहे, त्यामुळे ती प्रेरणा, त्यांच्या प्रयत्नातील सच्चेपणा, सकारात्मकता कथेतच असल्याने ती प्रेरित केल्याशिवाय राहत नाही. शिवाय, आनंदच्या वडिलांची भूमिका करणारे अभिनेता वीरेंद्र सक्सेना, रघुनाथ नामक पत्रकाराच्या भूमिकेतील अमित साध, सीआयडी फेम आदित्य श्रीवास्तव, मानव गोहिल ही मंडळी भाव खाऊन गेली आहेत. ३० मुलांमधील काही कलाकारांनी उत्तम काम केले आहे. अगदी छोटय़ाशा भूमिकेत मृणाल ठाकूरही भाव खाऊन जाते. मात्र हा जामानिमा या चित्रपटाला सुपर प्रभावी करत नाही.

* दिग्दर्शक – विकास बहल

* कलाकार – हृतिक रोशन, मृणाल ठाकूर, वीरेंद्र सक्सेना, अमित साध, आदित्य श्रीवास्तव, मानव गोहिल, नंदीश सिंग, पंकज त्रिपाठी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 1:09 am

Web Title: super 30 movie review abn 97
Next Stories
1 शाळेत दोनदा नापास झालेला ‘बंटी’; ‘सेक्रेड गेम्स’मुळे बदललं नशीब
2 मराठी कलाकार, तंत्रज्ञांना मिळणार ‘म्हाडा’चं हक्काचं घर
3 Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे पुन्हा येणार बिग बॉसच्या घरात ?
Just Now!
X