News Flash

#Super30Trailer : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा’,सामान्य गणितज्ञाची असामान्य कथा

चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरबाबतची उत्सुकता वाढली होती.

सुपर ३०

तब्बल दोन वर्षांनंतर हृतिक रोशन ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिनेसृष्टीत चर्चा असलेल्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हृतिकच्या दमदार अभिनयाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळतेय.

या चित्रपटात हृतिक गरीब मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दिसणार आहे. ट्रेलरमधूनच हृतिकने आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांपुढे साकारलं आहेत. हृतिकच्या देहबोलीपासून त्याच्या भाषेपर्यंत त्याने भूमिकेची केलेली तयारी दिसून येते. हृतिकचा लूक वाखणण्याजोगा असला तरीही बिहारी भाषेचा लहेजा पकडण्यात मात्र त्याला हवे तितके यश मिळालेले नाही. ट्रेलरमधून असे दिसून येते की, आनंद कुमार यांच्या अफाट बुद्धिमत्तेची, सातत्याची, त्यागाची,कठोर मेहनतीची ही गोष्ट आहे. ही केवळ एका गणितज्ञाची सामान्य कथा नसून, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शिकवण्यासाठी समाजातील श्रीमंत माणसांशी वैर पत्करणाऱ्या शिक्षकाची असामान्य कथा आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा’ असं म्हणत हृतिक विद्यार्थांना शिकण्यासाठी प्रेरणा देतो.

‘सगळेच सुपरहिरो कोट घालत नाहीत. कल्पना देशाला घडवतात व माणसांनी देश सक्षम होतो. भारतातील अशाच एका व्यक्तिमत्त्वाची ही कथा’ असं म्हणत हृतिकने ट्विटरवर ट्रेलरची लिंक शेअर केली आहे.

या आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि काही विद्यार्थी पावसाचा आनंद लुटताना दिसत होते. तसेच पोस्टरवर भूमितीमधील काही सूत्रे दाखवण्यात आली होती. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरबाबतची उत्सुकता वाढली होती.

‘रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्स’च्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून विकास बहल यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात याव्यात असे दिग्दर्शक विकास बहल यांना वाटत होते. त्या गोष्टी ट्रेलरमधून योग्य पद्धतीने दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ट्रेलर बघितल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 2:00 pm

Web Title: super 30 trailer launch hrithik roshan
Next Stories
1 लग्न म्हणजे मरणसंस्था- सलमान खान
2 Video: मृण्मयीच्या ‘मिस यू मिस्टर’ला पाहिलत का?
3 वयाच्या ४५व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवणारी मलायका फॉलो करते ‘हा’ डाएट प्लान
Just Now!
X