जगभरातील तरुणाई समाजमाध्यमे, व्हिडीओगेम्स यांच्याद्वारे कोणत्या ना कोणत्या व्यसनपोषी अवस्थेत गेलेली आहे. तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी गेल्यानंतर हे हिंसाधिक्य झाल्याची शेकडो संशोधने लावली गेली असे म्हटले, तर त्याआधी युवकांमध्ये हिंसा नव्हती असे म्हणता येणार नाही. अगदी विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ फ्लाईज’पासून ते साठोत्तरी जागतिक साहित्य-सिनेमाने युवकांच्या बंडखोरीचा वाममार्ग हा हिंसेत आवृत्त होत असल्याचे मांडले आहे. अमेरिकेमधील कोलंबिया शहरात १९९९ साली दोन शाळकरी मुले वर्गात बंदूक घेऊन दाखल झाली आणि त्यांनी आपल्याच सहध्यायींवर बेछूट गोळीबार केला. त्यात १३ ठार तर अनेक जखमी झाले. या घटनेच्या अवतीभवती फिरणारे अनेक सिनेमे आणि कादंबऱ्या आल्या. याशिवाय या घटनेची पुनरावृत्ती गेल्या दोन दशकांत थांबलेली नाही. धुमसत्या युवकांची खदखद त्यांना क्रूरकर्म करण्यास कशी प्रवृत्त करते, या निष्कर्षांप्रत येणाऱ्या उत्तम सिनेमांमध्ये यंदा आलेल्या ‘सुपर डार्क टाइम्स’चे नाव सहज घेता येईल. एका विशिष्ट काळातील हिंसेच्या युवामानसशास्त्राचा शोध घेताना तो तरुणाईच्या अनेक प्रश्नांशी भिडतो.

या चित्रपटाची सुरुवातीची तीनेक मिनिटे चित्रपटाची कल्पना स्पष्ट करणारी आहेत. शाळेतील एका इमारतीच्या काचेला फोडून एक जंगली श्वापद आत शिरलेले असते. रक्ताने माखलेल्या या श्वापदाचा मृत्यू झालेला नसतो. अंगात धुगधुगी असली तरी जगण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे या श्वापदाला यातनामुक्त करण्यासाठी पोलिसांची दुकली योग्य ते पाऊल उचलते. ही घटना योग्य की अयोग्य याबाबतच विचार मनात घोळवत असतानाच या शाळेतील दोन पौगंडवयीन मुलांच्या गप्पांवर कॅमेरा केंद्रित होतो. आपल्या शाळेतील मुलींविषयी (आणि काही शिक्षिका) त्यांच्या वयसुलभ गप्पा सुरू असतात. जॉश (चार्ली टहान) आणि झॅक (ओवेन कॅम्पबल) ही जोडगोळी जवळजवळ बिघडल्यासारख्या दिसणाऱ्या छोटय़ाशा टीव्हीवर खराब व्हीएचएसद्वारे अश्लील चित्रपटही पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या मुलींच्या गप्पांची मैफल समेवर आलेली असताना एकाच मुलीमध्ये दोघांना स्वारस्य असल्याची जाणीव त्यांना होते. कृतीप्रवण होण्यासाठी मग ते शहराचा फेरफटका करून त्या मुलीच्या घराचे दर्शन घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी या दोघांची शहरातल्या वेगळ्या भागात असणाऱ्या डेरील आणि चार्ली नावाच्या समवयीन मुलांशी गट्टी जमते. शहराची निरुद्देश वेळसंपवू भटकंती करीत ते चौघे अर्थातच आपल्या पौरुषी कहाण्यांची देवघेव करतात. पुढे जॉशच्या घरामध्ये त्यांना त्याच्या भावाची एक तलवार सापडते आणि कंटाळवाण्या जगण्याला धाडसात बदलण्याचा मार्गही.

एका जंगलात तलवारबाजीचे प्रयोग करीत असताना डेरील या अत्यंत घाणेरडय़ा गप्पा मारणाऱ्या मुलाशी जॉशचे भांडण होते. अगदी साध्या प्रकारच्या बोलाचालीचे भांडण अपघाताने डेरीलच्या गळ्यात तलवार घुसण्याने संपते. डेरीलचा मृत्यू अन्य तिघांसाठी भीषण धक्का बनतो. ते या धक्क्य़ाला पचविण्यासाठी डेरीलच्या मृतदेहाला जंगलात लपवून तेथून पळ काढतात. चुकून तलवार डेरीलच्या गळ्यात घुसविणाऱ्या जॉशहून अधिक ओरखडा बसतो तो झॅकच्या मनावर. एकल मातृत्व जगत असलेल्या आईसोबत राहणाऱ्या झॅकचे आयुष्य या प्रकारामुळे हादरते. त्याच्या मागे दु:स्वप्नांची मालिका प्रगट होते. जॉश या साऱ्या प्रकारात आधी स्वत:ला कोंडून घेतो आणि नंतर स्प्रिंगसारखा उसळून हिंसेची नवी वाट आजमावण्यास सज्ज होतो.

दिग्दर्शक केव्हिन फिलिप्स यांचा हा पहिलाच सिनेमा वेगळा अशासाठी की त्याचा कालावधी हा अमेरिकेतील हायस्कूलमध्ये हिंसाचार घडण्याच्या आधीचा आहे. या काळातील अमेरिकेच्या एका मुर्दाड खेडय़ातील संथ जीवनाची ओळख या सिनेमामध्ये करून देण्यात आली आहे. तरुणाईच्या हाती मोबाइल येण्याआधीचा हा काळ आहे. या शहरामध्ये एक बंद करण्यात आलेला पूल आहे. शहरात काही थोर घडत नाही. त्याचा परिणाम युवकांची ऊर्जा ड्रग्ज आणि इतर कूकर्माचा अंगीकार करण्यात वाया चाललेली आहे. या कथेत मुलाची हत्या उघड होण्याकडे दिग्दर्शकाला जराही स्वारस्य नाही. त्याला दाखवायचे आहे युवकांच्या मूलभूत हिंसाप्रेरणेला. आजच्या तंत्रज्ञानाच्या अधिक्याने, व्यसनाने आणि मद्य-फास्टफूडच्या अतिसेवनाने तरुण असे वागतात, हा निष्कर्ष काढणाऱ्या कित्येक संशोधनांना हा चित्रपट खोडून काढतो. रहस्य आणि मनोरंजनासोबत तरुणाईच्या मनातील सार्वत्रिक आणि सार्वकालिक कोपऱ्याशी हा चित्रपट आपल्याला परिचित करून देतो. टीन एजर्सच्या सध्याच्या ढिगानी येणाऱ्या विनोदी सेक्सपटांच्या तुलनेत हा खूप उजवा प्रयत्न आहे.