सुपरस्टार रजनीकांत आता राजकारणात सक्रिय झाले असले तरीही रुपेरी पडद्यावर असणारा त्यांचा वावर मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात रजनीकांत ‘काला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. कामगार दिनाच्याच दिवशी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, सोशल मीडियावरही त्याची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली.

तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हे गाणं लाँच करण्यात आलं असून, सेम्मा वेतू असे या गाण्याचे तामिळ बोल आहेत. येमा ग्रेटू असे या गाण्याचे तेलुगू बोल आहेत. तर बहुत भारी है असे बोल असणारं हे हिंदी गाणं सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. रॅप प्रकारात असणाऱ्या या गाण्यात काही मराठी शब्दांचा वापरही झाल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

दाक्षिणात्य ठेका असलेल्या या गाण्यात ‘काला’ रुपातील रजनीकांत यांचा लूक लक्षवेधी ठरत आहे. ज्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. रोहित फर्नांडिस, हरिहरसुधन आणि संतोष नारायण यांनी गायलेल्या या गाण्याला खास असा रॅप साँगचा टच देण्यात आला आहे. डोप डॅडी, टोनी सायको, एमसी मवाली, अर्जुन कामराज यांनी या गाण्यासाठी रॅप आणि बिट बॉक्सिंग केलं आहे. पीए रंजित दिग्दर्शित काला हा चित्रपट २७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, तामिळ एक मार्चलाच तामिळ चित्रपटसृष्टीतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे आता कालाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, थेट ७ जूनला सुपरस्टार रजनी प्रेक्षकांच्या भेटीला येतील. वंडरबार फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून नाना पाटेकर, हुमा कुरेशी, समुद्रकणी, इश्वरी राव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.