‘पद्मावत’ चित्रपटावरील चार राज्यांमधील बंदी उठवण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका हरयाणातील माजी भाजप नेते सूरज पाल अमू यांनी केली आहे. त्याचबरोबर मला फाशी दिली चालेल, पण संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाला आमचा विरोध कायम असेल, असे विधान त्यांनी केले. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरयाणा या चार राज्यांमध्ये असलेल्या चित्रपटांच्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे २५ जानेवारी रोजी ‘पद्मावत’ देशातील सर्व राज्यांत प्रदर्शित होणार आहे.

या निर्णयाने सुप्रीम कोर्टाचा आदर करणाऱ्यांच्या भावना दुखावल्याची टीका सूरज पाल अमू यांनी केली असतानाच दुसरीकडे छत्तीसगढमध्ये आंदोलकांनी चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे. राजपूत समाजाच्या सदस्यांनी छत्तीसगढचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांना ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी आणण्यासाठी निवेदन दिले आहे. ‘हा अंतिम इशारा आहे. महाराणी पद्मावती या आमच्या प्रतिष्ठेच्या प्रतीक आहेत. छत्तीसगढमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. ज्या चित्रपटगृहांमध्ये पद्मावत प्रदर्शित होईल, तो जाळला जाईल. आम्हाला कोणतेच बदल नको आहेत. चित्रपटावर पूर्णपणे बंदी आणा हीच आमची मागणी आहे,’ असे त्यांनी म्हटले.

वाचा : भन्साळींना दिलासा; ‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

चित्रपट प्रदर्शनावर चार राज्यांमध्ये असलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. त्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सर्व राज्यांची आहे आणि चित्रपट स्क्रिनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.