आज ५ मे रोजी राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा धक्कादायक असल्याचे म्हणत दिग्दर्शक केदार शिंदे संताप व्यक्त केला आहे.

केदार शिंदेने मराठी आरक्षणासंबंधी केलले ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये त्याने, ‘आजचा मराठा आरक्षणाबद्दलचा सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!’ असे म्हटले असून संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : करोनामुळे पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या- सोनू सूदची मागणी

१९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली. सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगितलं. तसंच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासारखी परिस्थिती नाही असंही सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं.