‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलिब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्रीय संगीत असो वा पाश्चिमात्य संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. मात्र यावेळी सुरेल धक्का देण्याची पाळी कॅप्टन आणि पाहुण्यांची होती. ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर पहिल्यांदाच उस्ताद अल्लारखाँ यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे मोठे भाऊ  सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी हजेरी लावली. आणि पहिल्यांदाच या मंचावर तौफिक कुरेशींचा ताल आणि कॅप्टन महेश काळेंचे सूर अशी अनोखी जुगलबंदी रंगली.

‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये या सोमवार आणि मंगळवारच्या भागाची थीमही काही वेगळी असणार आहे. ‘वाद्य’ ही या आठवडय़ाची थीम होती. खास त्यासाठी या भागामध्ये ‘जिम्बे’ या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तौफिक कुरेशी यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत यावेळी मंचावर ‘वाद्य’ ज्या गाण्याचा महत्त्वाचा भाग आहे अशी एकाहून एक रंगतदार गाणी स्पर्धकांनी सादर केली. सोमवार आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता हा खास भाग पाहता येणार आहे.

स्पर्धकांच्या हटके गाण्यांबरोबरच महेश काळे यांची गायकी आणि तौफिकजींचे ‘जिम्बे’ हे वाद्य शिवाय त्यांच्या साथीला ख्यातनाम सँक्सोफोन वादक श्यामराज अशी अनोखी मैफल जमली. सुरांच्या या जुगलबंदीने सगळे मंत्रमुग्ध झाले. ‘अलबेला सजन आयो’ रे या गाण्यावर ही सुरेल जुगलबंदी रंगली होती. महेश काळे आणि तौफिक कुरेशी यांना एकत्र एकाच मंचावर ऐकण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना या शोच्या निमित्ताने मिळणार आहे.

या खास भागामध्ये ढोलकी, तबला, बासरी अशी आणि या प्रकारची अनेक वाद्यांचा समावेश असणारी गाणी स्पर्धकांनी गायली. ज्यामध्ये शरयू दाते हिने ‘मला म्हणतात पुण्याची मैना’ हे गाणे सादर केले. शमिका भिडेने ‘कांदे पोहे’ सिनेमातील गाणे सादर केले तर निहिरा जोशी हिने ‘ओ सजना’ हे गाणे गाऊन कार्यक्रमात रंग भरला. आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढय़ाच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनसची आणि तौफिक कुरेशींचेही मन जिंकले. याशिवाय या आठवडय़ात मानाची सुवर्ण कटय़ार कोणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.