दिवाळीच्या मूहुर्तावर बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी कॉमेडी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, अभिषेक बच्चनचा ‘लूडो’ आणि आता दिलजीत दोसांजचा ‘सूरज पर मंगल भारी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘सूरज पर मंगल भारी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहाता मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिषेक शर्मा दिग्दर्शित सूरज पर मंगल भारी चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ३ मिनिटे १६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दिलजीत आणि मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला सूरज (दिलजीत) लग्नासाठी एक आदर्श मुलगी शोधत असतो. तर दुसरीकडे मंगल (मनोज बाजपेयी) अनेकांची लग्न मोडत असतो. सूरजचे लग्न मंगल मोडतो आणि त्यानंतर सूरज त्याचा बदला घेण्यासाठी करत असणारे प्रयत्न हे सर्व ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. सुप्रिया या मनोज बाजपेयीच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. एकंदरीत सूजर आणि मंगल यांच्यामधील संवाद ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.
आणखी वाचा : अॅक्शन आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘लूडो’चा ट्रेलर प्रदर्शित
‘सूरज पर मंगल भारी’ या चित्रपटात दिलजीत आणि मनोज यांच्यासोबतच फातिमा शेख, अनू कपूर आणि सुप्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा कॉमेडी चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. हा चित्रपट १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 6:05 pm