करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउनचा कालावधी सुरु होता. या काळात उद्योग-व्यवसायांपासून ते कलाविश्वापर्यंत अनेक क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले होते. मात्र,आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून हळूहळू प्रत्येक क्षेत्रातील कामकाज पूर्वपदावर येत आहे. यामध्येच आता कलाविश्वदेखील बहरु लागलं आहे. तब्बल ८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे लॉकडाउननंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘सूरज पे मंगल भारी हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ आणि मनोज वाजपेयी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. देशभरातील जवळपास ८०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८० लाख रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, या चित्रपटात मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ, फातिमा सना शेख हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर सुप्रिया पिळगावकर, मनोज पाहवा, सीमा पाहवा, अन्नू कपूर आणि विजय राज या कलाकार मंडळींनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे.