बॉलिवूडमध्ये ‘दबंग खान’ म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता सलमान खानची कोणतीही ऑफर नाकारण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. कलाविश्वात त्याच्याविषयी अनेकांच्या मनात आदरयुक्त भीतीसुद्धा आहे. अशा या अभिनेत्याची नजर नुकतीच एका घोड्यावर पडली आणि त्याने तो घोडा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्य म्हणजे त्या घोड्यासाठी सलमान दोन कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजण्यासाठीसुद्धा तयार झाला होता. पण, घोड्याच्या मालकाने मात्र त्याचा प्रस्ताव नाकारला.

अतिशय दुर्मिळ प्रजातीच्या त्या घोड्यासाठी सलमानने मूळ मालकाला म्हणजेच साकब यांना कोट्यवधी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. साकबला याआधीही अनेकांनी त्या घोड्याची खरेदी करण्यासाठी विचारणा केली होती. पण, त्याने सर्व प्रस्तावांना स्पष्ट नकार दिल्याचं ‘एएनआय’ने प्रसिद्ध केले आहे.

साधारण एक वर्षापूर्वी पंजाबच्या राजकारणातील प्रतिष्ठित बादल कुटुंबियांनीसुद्धा या घोड्यासाठी १.११ कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती. पण, त्यासाठीही साकबने स्पष्ट नकार दिला.

हा घोडा अत्यंत खास असून शर्यतीच्या वेळी तो ताशी ४० किमी वेगाने धावतो आणि पुढे त्याचा वेग वाढत जातो, अशी माहिती त्याच्या मालकाने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. सहसा शर्यतींमध्ये घोड्यांचा वेग काही वेळानंतर कमी होऊ लागतो. पण, साकबचा घोडा खास असून, त्याचा वेग वाढत जातो आणि हीच गोष्ट त्याला प्रकाशझोतात आणत आहे.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

साकबने दिलेल्या माहितीनुसार सलमानने एका एजंटद्वारे काही दिवसांपूर्वी हा घोडा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सुरतच्या एका इसमाने हा घोडा खरेदी करण्यासाठी ३ कोटींचा आकडा मोजण्याचीही तयारी दाखवली, पण तरीही साकबने हा घोडा विकण्यास नकार दिला. सध्याच्या घडीला साकबचा हा घोडा देशातील सर्वात वेगवान घोडा असून, विविध महोत्सवांमध्ये त्याची उपस्थिती अनेकांचेच लक्ष वेधतेय.