‘‘जात कहाँ हो अकेली गोरी।’’

सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोहाचे हे ३७ वे वर्ष नेहमीच्याच उदंड उत्साहाने पार पडले. या गोमंतकात स्वरांचा पाऊस पडतो की काय असे वाटावे, इतके कलावंत या भूमीने दिले आहेत. त्यामुळे या भूमीला स्वरभूमी असे म्हणणेच योग्य ठरेल. पं. उल्हास कशाळकर यांच्या दर्जेदार गायनाने या स्वरमहोत्सवाचा प्रारंभ झाला. सुरुवातीस त्यांनी ललिता गौरी हा विवांबित त्रितालामधील ख्याल सादरीकरणासाठी घेतला. बोल होते- ‘प्रीतम सय्या दरस दिखा जा।’ हा पूर्वी थाटातला सायंकालीन राग त्यांनी खूप प्रभावीपणे सादर केला. दमदार स्वर लगाव, संथ गतीने चाललेली आलापी, मध्यम षडज स्वरांवर येणारे व निघणारे बेहेकावे रागसौंदर्य वाढवित होते. एरवी ग्वाल्हेरची छाप असणाऱ्या गायनात उल्हासजींनी संपूर्णपणे जयपूर गायकी अतिशय ताकदीने मांडली. बसंतीकेदार आणि पटबिहाग हे रागही खास जयपूर गायकीच्या पद्धतीने सादर करून दाद मिळवली. यानंतर स्वर मंचावर श्री. राकेश चौरसिया व श्रीमती जयंती कुमरेश यांचे बासरी व सरस्वती वीणा सादर करण्यासाठी आगमन झाले. सर्वप्रथम राग मधुवंती ज्याला दक्षिणात्य (कर्नाटक) संगीतात धर्मवतीमधील गत आलाप जोड झाला. या क्रमाने सादर केली.

पं. अजय पोहनकर यांचे गायन ही नेहमीच भावानुभूतीची मैफल असते. यावेळीही तोच अनुभव त्यांच्या यमनमुळे आला.  तबल्याच्या साथीसाठी रामदास पळसुले होते. ‘य: मन:।’ म्हणजे मनाची अशी स्थिती त्याचे प्रतिबिंब या रागात पडते. पंडितजींचा आवाज अतिशय खानदानी. त्यांचे खर्जातले काम पाहून सारेच विस्मयचकित झाले. उस्ताद ईरशाद खाँ यांच्या सूरबहार वादनाने सत्र संपले. हे वाद्य अतिशय जुने व देखणे, विदुषी अन्नपूर्णादेवी, उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांच्या कन्या या हे वाद्य वाजविणयात प्रवीण होत्या.सकाळच्या दुसऱ्या सत्रात उस्ताद सुजात हुसेन खाँ यांचे सतारवादन झाले. अल्हैय्या बिलावल या बिलावल थाटातील रागाची त्यांनी सादरीकरणासाठी निवड केली. तबला साथीसाठी दोन तबलजी होते. मयांक बेडेकर व सपन अंजारिया.

यानंतर अभय रुस्तुम सोपोरी या देखण्या तरुण संतूर वादकाचे स्वरमंचावर आगमन झाले. पाण्यावर उमटणाऱ्या जल लहरी, ठिबकणारे जलबिंदू, हिरवागार निसर्ग असे सुंदर दृश्य मन:पटलावर उमटवायचे. सामथ्र्य या नाजूक वाद्यात निश्चितच आहे. या भावपूर्ण स्वर सोहळ्याची सांगता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक पं. एम. वेंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. तबल्यावर भरत कामत, तर स्वरसंवादिनीवर विश्वनाथ कान्हेरे होते. श्रृतींवर ऐश्वर्या व रमेशजी कोलकांडा होते. सुरुवातीस छायानट हा कल्याण थाटातील राग सादरीकरणासाठी त्यांनी निवडला. ‘नयन बूँदला- मालनिया।’ हे बंदिशीचे बोल होते. अतिशय सुरेश स्वरलगाव, अध्यात्मिक साधनेने मिळविलेल्या शांत, निशंक मनाचे प्रतिबिंब त्यांच्या गायनावर पडत होते.या महोत्सवात देवकी पंडित, रघुनंदन पणशीकर, तबलावादक योगेश समसी यांच्यासारख्या बुजुर्ग कलावंतांबरोबरच नीलेश शिंदे, श्रीमती कोमल साने यांच्यासारख्या नव्या उमेदीच्या कलावंतांनीही दाद मिळवली हे विशेष.कलाकार हा अमर असतो म्हणतात, हे अगदी सत्य आहे. नासाच्या शास्त्रज्ञांना परग्रहावर वस्ती असावी असे वाटते. या शोधासाठी अंतराळ यान एप्रिल १९७७ रोजी पाठविण्यात आले. गेल्या ४० वर्षांत २०.८ अब्ज कि.मी. अंतर या यानाने नुकतेच पूर्ण केले. परग्रहावरील मानवांना या पृथ्वीवरचा समृद्ध असा शास्त्रीय संगीताचा परिचय व्हावा म्हणून एक तांब्याची सुवर्ण विलेपित ग्रामोफोन रेकॉर्ड तयार केली. त्यावर सूरश्री केसरबाईंची भैरवी रेकार्ड केली. ‘‘जात कहाँ हो अकेली गौरी।’’ आणि अनेक इतरही सांस्कृतिक पुरावे पाठविले. यास पृथ्वीची स्पंदने असे नाव दिले. सूरश्रींचे सूर काही दिवसातच परग्रहावर पोहोचतील. हा सूरक्षींचा जगाने केलेला फार मोठा बहुमान आहे. कलाकार हा खरंच अमर असतो. सूरश्रींना माझा त्रिवार प्रणाम!