करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात सर्वच क्षेत्रातील कामकाज ठप्प आहे. सहाजिकच चित्रपटगृहदेखील बंद आहेत. त्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक,निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट चित्रपटगृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाच दाक्षिणात्य चित्रपटांनीदेखील प्रदर्शनासाठी हाच मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पोनमगल वंधल हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपट लोकप्रिय अभिनेत्री ज्योतिकाने मुख्य भूमिका साकारली असून ती वकिलाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. या चित्रपटात कोर्टरुम ड्रामा दाखविण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा डिजिटल प्रीमिअर सोहळा पार पडला होता. या चित्रपटाची निर्मिती सुपरस्टार सूर्याने केली आहे. तर दिग्दर्शन जे.जे. फ्रेड्रिक यांनी केलं आहे.