अभिनेता सुशांत शेलारचं एक वेगळं रूप आगामी ‘गर्भ’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. भक्कमपणे एखाद्याच्या मागे उभं राहणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. आलेल्या परिस्थितीला सामोर जात बायकोच्या पाठीशी ठामपणे उभं राहणाऱ्या समंजस नवऱ्याची भूमिका सुशांतने यात साकारली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सुशांत सांगतो की, आजवर मी केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. अतिशय समंजस पतीची व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. ‘श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस्’ ही निर्मिती संस्था व राजेंद्र आटोळे यांनी ‘गर्भ’ या मराठी कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्मिती शंकर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी केली आहे. सुभाष घोरपडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
सुशांत शेलार, सिया पाटील, निशिगंधा वाड, अनंत जोग, यतीन कार्येकर तसेच या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारे आरजे दिलीप यांच्या भूमिका ‘गर्भ’ चित्रपटात आहेत. चित्रपटाची वेगळ्या धाटणीची कथा रमेश तिवारी यांनी लिहिली असून पटकथा धीरज डोकानिया, रमेश तिवारी यांनी लिहिली आहे. १ ऑक्टोबरपासून ‘गर्भ’ च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.