सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांची क्वारंटाइनमधून सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनय तिवारी यांनी मला नाही तर तपासाला क्वारंटाइन करण्यात आलं होतं अशी टीका केली. सुशांत सिंहच्या वडिलांनी पाटणा येथे पोलीस तक्रार केल्यानंतर बिहार पोलिसांचं पथक तपासासाठी मुंबईत दाखल झालं होतं. विनय तिवारी यांना तपासाचं नेतृत्त्व करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. पण मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

“मला नाही तर तपासाला क्वारंटाइन केलं होतं असं मी म्हणेन. बिहार पोलीस तपास करत होतं. मला क्वारंटाइन केल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला. ज्या वेगाने तपास करण्यासाठी आम्ही आलो होतो तो करु शकलो नाही,” असं विनय तिवारी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांवर थेट आरोप करणं टाळलं. आपल्याला पोलिसांनी नाही तर महापालिकेने क्वारंटाइन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोणतीही यंत्रणा एकत्र काम करत असते. आपल्याला एकत्र काम करणं गरजेचं आहे असं सांगताना सीबीआय तपास करत असल्याने सुशांत सिंह प्रकरणावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही असंही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी गुरुवारी पुन्हा राज्यात रवाना झाले. क्वारंटाइन असल्याने विनय तिवारी मुंबईतच होते. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यावरुन टीका करताना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.