बॉलिवूडचा सगळ्यात व्यग्र अभिनेता कोण, म्हटल्यावर बोट अभिनेता सुशांत सिंग राजपूतकडेच वळेल. कारण खरंच तो सध्या लागोपाठ चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. नुकताच सुशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री संजना संघी हिच्यासोबतचा एक सुंदर रोमँटिक फोटो शेअर केलाय. आणि त्याखाली लिहिलंय नवी सुरुवात. त्यामुळे आगामी फॉल्ट इन अवर स्टार्स या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी त्याने तयारी सुरु केलीय, असं बोललं जातंय. काही महिन्यापूर्वी कास्टींग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांनी दिग्दर्शक म्हणून फॉल्ट इन अवर स्टार्स या चित्रपटाचा रिमेक करणार असल्याचं जाहीर केलं होतं. अभिनेत्री संजना हिचासुद्धा हा पहिलाच चित्रपट आहे. पण चर्चा मात्र सुशांतचीच आहे. कारण एम. एस. धोनी चित्रपटांनतर सुशांतची गाडी एकदम सुस्साट आहे. चंदामामा दूर के, केदारनाथ, सोनचिरैय्या आणि फॉल्ट इन अवर स्टार्स चा रिमेक असे चार लागोपाठ चित्रपट तो करतोय. त्यामुळे हा गडी लई खुशीत हाय. याविषयी त्याने आपल्या आईची एक आठवणही सांगितली आहे. त्याची आई त्याला एकदा म्हणाली होती, तुझी गोष्ट तू स्वत सांगशील. आणि सध्या मी आईच्या या म्हणण्याचा अर्थ अनुभवतोय, असं सुशांत म्हणाला.