बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग सध्या चांगलाच प्रकाशझोतात आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून यशाच्या शिखरावर पोहचलेल्या सुशांने आता आणखीन एक शिखर गाठले आहे असे म्हणावे लागेल. याचे कारणही तसेच आहे. सुशांतसिंग राजपूतसोबत फोटोशूट करण्यासाठी अमेरिकेतील सुपर मॉडेल चक्क भारतामध्ये आली होती. सुशांत आणि सुपर मॉडेल आणि रिअॅलिटीशोमधील लोकप्रिय चेहरा असणारी केंडाल जेन्नर यांचे नुकतेच एक फोटोशूट करण्यात आले. जगप्रसिद्ध  छायाचित्रकार मारियो टेस्टिनो यांनी त्यांचे फोटोशूट केले आहे. सुशांत आणि केंडाल जेन्नरयांच्यात झालेले फोटोशूट जयपूरमध्ये करण्यात आले.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत आणि केंडाल यांचे हे फोटोशूट राजकुमार आणि राजकूमारीच्या वेशात करण्यात आल्याचे समजते.  फोटो लिक होऊ नये यावर विशेष खबरदारी घेण्यात आली होती. यासाठीच सुशांत आणि केंडाल जेन्नर यांच्या फोटोशूटवेळी सुरक्षाव्यवस्थेवर अधिक भर देण्यात आला होता. फोटोशूट बाबत बाळगलेल्या गोपनियतेमुळे सुशांतचे चाहते त्याचा रॉयल लूक पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील. फोटोशूटझाल्यानंतर केंडाल जेन्नर  ४ फेब्रुवारीलाच अमेरिकेला परतली आहे. जगप्रसिद्ध छायाचित्रकार मारियो यांनी सुशांत आणि केंडाल जेन्नर यांना कॅमेऱ्यात कैद केले. मारियो यांच्याविषयी बोलायचे तर त्यांना रॉयल फोटोग्राफीसाठी ओळखले जाते. मारियो यांच्या सर्वोत्कृष्ट फोटोशूटमध्ये १९९७ मध्ये निधन झालेल्या  राजकुमारी डायना, ड्युक अॅण्ड डचिस ऑफ केब्रिजचे प्रिन्स विल्यम आणि  प्रिन्सेस केट यांच्या साखरपूड्याच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

सुशांत सिंग हा  संजय पूरण सिंग दिग्दर्शिक ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका अंतराळवीराची भूमिका साकारताना दिसेल. यापूर्वी  महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटासाठी त्याने अधिक मेहनत घेतल्याचे दिसले होते. ‘धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी सुशांतसिंग तासन् तास गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचा. त्याला त्याच्या मेहनतीचे फळ देखील मिळाले होते. त्यामुळे यशाचा हा मंत्र सुशांत आजही विसरलेला नाही. त्यामुळेच सुशांत राजपूत आगामी ‘चंदा मामा दूर के’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंतराळवीराची भूमिका करायची म्हणजे त्याचे तर्कशुद्ध प्रशिक्षणही घेतले पाहिजेच ना… म्हणूनच सुशांत आता हे प्रशिक्षण घ्यायला नासामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.