अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बँकॉक ट्रिपचा उल्लेख केला. सुशांत त्याच्या सहा मित्रांसोबत बँकॉक ट्रिपला गेला होता आणि या ट्रिपमध्ये त्याने ७० लाख रुपये खर्च केल्याचं रियाने सांगितलं. या ट्रिपमध्ये सुशांतसोबत असलेल्या साबिर अहमदने नवा खुलासा केला आहे. ‘इंडिया टुडे टिव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत साबिर म्हणाला, की अभिनेत्री सारा अली खानसुद्धा या ट्रिपमध्ये सुशांतसोबत होती.

बँकॉक ट्रिपदरम्यान साबिर हा सुशांतचा असिस्टंट होता. सुशांतच्या पीआरओ टीमसाठी या ट्रिपचं आयोजन करण्यात आलं होतं. सुशांतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सारा अली खानसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी झाली होती. याविषयी साबिर म्हणाला, “आम्ही सात जण होतो. सुशांत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल झवेरी, अब्बास, सुशांतचा बॉडीगार्ड मुश्ताक आणि मी. डिसेंबर २०१८ मध्ये प्रायव्हेट जेटने आम्ही गेलो होतो. ट्रिपच्या पहिल्या दिवशी आम्ही सगळे मिळून समुद्रकिनारी गेलो होतो. पण नंतर सुशांत आणि सारा बाकीचे सर्व दिवस हॉटेलच्या रुममध्येच होते. आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो.”

त्यावेळी त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आल्याने बँकॉकची ट्रिप लवकर आटोपल्याचं साबिरने सांगितलं. “त्सुमानीची शक्यता वर्तवण्यात आल्याने बाकीचे सर्वजण भारतात परतले. पण विमानाची तिकिटं न मिळाल्याने मी आणि मुश्ताक बँकॉकमध्येच राहिलो. जवळपास महिनाभरासाठी आम्ही बँकॉकमध्ये राहिलो आणि सुशांतने खर्चासाठी त्याचा एटीएम कार्ड आम्हाला वापरायला दिला होता. त्यानंतर सॅम्युअल होकिपने आम्हाला मुंबईतून पैसे पाठवले”, असं साबिरने स्पष्ट केलं.