बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, बुधवारी या घटनेला वेगळ वळण मिळालं. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंह गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते. आता सुशांतचे सीए यांनी यावर वक्तव्य केले आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार रियाने सुशांतच्या खात्यामधील पैसे तर खर्च केले आहेत पण मोठी रक्कम काढण्यात आलेली नाही. तसेच सुशांतच्या कुटुंबीयांनी दावा केलेली मोठी रक्कम त्याच्या खात्यामध्ये उपलब्धच नसल्याचे सीएने सांगितले आहे.

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या खात्यामध्ये १७ कोटी असल्याचे म्हटले होते. तसेच गेल्या एक वर्षात १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ज्या ठिकाणी हे पैसे खर्च करण्यात आले आहेत त्याचा माझ्या मुलाशी काही संबंध नाही. माझ्या मुलाच्या सगळ्या बँक अकाऊंटची पडताळणी करण्यात यावी असे म्हटले होते.

सुशांतच्या वडिलांनी रियावर केलेले आरोप-

तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”.

“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.