बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी विनंती सातत्याने केली जात आहे. मात्र ही विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळली आहे. सुशांत प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीसच करतील असं त्यांनी म्हटलं आहे.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीसच करतील. मुंबई पोलीस योग्य प्रकारे चौकशी करत आहेत. त्यामुळे या केसला सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. असं म्हणत अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली.

मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

सुशांत प्रकरण आता नव्या वळणावर

सुशांत प्रकरणात आता पटना पोलिसांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे या केसमध्ये आता नवी वळणं येऊ लागली आहेत. सर्वप्रथम सुशांत आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांसोबतच पटना पोलीस देखील करत आहेत.