अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांची स्तुती करत सुशांतचे वडिल के.के. सिंह यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. या लग्नामुळे सुशांत आपल्या वडिलांवर नाराज होता असा दावा त्यांनी केला. मात्र यामुळे सुशांतचे कुटुंबिय संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतचे चुलत भाऊ भाजपा नेता नीरज सिंह बब्लू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. “सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. असे खोटे आरोप करणं चुकीचं आहे. अफवा पसरवून संजय राऊत या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबावर केलेल्या या आरोपासाठी आम्ही त्यांच्यावर मानहानिचा दावा ठोकणार आहोत.” असा इशारा नीरज सिंह यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत दिला.
आणखी वाचा- “हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव…,” सुशांत सिंह प्रकरणी संजय राऊत यांचं खुलं आव्हान
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून ‘रोखठोक’ सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. “मुंबई पोलीस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. मुंबई पोलीस दबावाला बळी पडत नाहीत. ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. त्यात अनेक बडी नावे गुंतली होती, पण पोलिसांनी सगळय़ांना तुरुंगात पाठवले. मुंबई पोलिसांनीच २६/११ चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे,” असं राऊत यांनी म्हटलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 2:09 pm