अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असताना सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी याप्रकरणात पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनीही हाती घेतला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर आर्थिक आरोपही केले असून, ईडीनं (सक्तवसुली संचालनालय) या प्रकरणात लक्ष घातलं आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेले आरोपपत्रातील माहिती मागवली आहे. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मु्ंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलीस चौकशी करत असताना सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून रिया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुशांतच्या वडिलांनी रियानं सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणात ईडी आर्थिक अंगानं तपास करणार आहे. ईडीनं बिहार पोलिसांकडून सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती मागवली आहे. या माहितीची चौकशी ईडीकडून केली जाणार असून, बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात ईडीनं सुशांतचे सर्व बँक खात्यांची माहिती मागवली आहे.

“रियाला पोलिसांकडून मदत”

सुशांत सिंह याचे वडील के.के. सिह यांचे वकील विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना दावा केला की,”जर ती (रिया चक्रवर्ती) सर्वोच्च न्यायालयात गेली असेल, तर तिने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करायला हवी. पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे आणि आता तिने (रिया) बिहार पोलिसांच्या चौकशीला स्थगिती देण्याची व याचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मग मुंबई पोलिसातील कुणीतरी तिला मदत करत आहे, यासाठी यापेक्षा मोठा पुरावा कोणता हवाय,” असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे.