अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी भन्साळींना पुढील एक-दोन दिवसांत समन्स बजावण्यात येणार आहे. ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार भन्साळी यांच्याशिवाय यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मालाही पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत. शानू शर्माची याआधी एकदा पोलिसांकडून चौकशी झाली होती. २८ जून रोजी तिने वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावली होती.

शानू शर्माने सुशांतसोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या दोन चित्रपटांसाठी काम केलं होतं. याशिवाय अभिनेत्री कंगना रणौत आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचं कळतंय. सुशांतच्या आत्महत्येनंतर हे दोघंही सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर बोलत आहेत. त्यामुळे त्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचं समजतंय.

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता, असं म्हटलं जातंय. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत वीसहून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.