केरळमध्ये महापुराने थैमान घातलं असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ, लष्कर, नौसेना, हवाई दलासहित इतरही जवान आणि स्वयंसेवक दिवसरात्र बचावकार्य करत आहेत. त्याबरोबच अनेक स्तरांमधून पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे येत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी येथील नागरिकांना आर्थिक मदत केली असून अभिनेता सुशांतसिंह राजपूतही मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

केरळमधील पूरपरिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने केरळला तातडीने २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तर अक्षयकुमार, सनी लिओनी या सेलिब्रेटींनीही शक्य तेवढी मदत केली आहे. या सेलिब्रेटींप्रमाणेच सामान्य नागरिकही केरळवासीयांना मदत करत आहे. ज्या व्यक्तींना मदत करणं शक्य नाही अशा व्यक्ती अन्य काही जणांना मदतीचे आवाहनही करताना दिसत आहे.

सुशांतसिंहच्या एका चाहत्याने सुशांतकडे ट्विटरद्वारे मदत मागत केरळच्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. या इच्छेचा मान राखत सुशांतने मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून केरळच्या नागरिकांसाठी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

शुभम राजन असं या चाहत्याचं नाव असून त्याला केरळवासीयांची मदत करण्याची इच्छा होती. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला मदत करणं शक्य नव्हतं. यासाठी शुभमने सुशांतकडे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सल्ला मागितला होता. चाहत्याची ही अडचण लक्षात घेत सुशांतने शुभमच्या नावाने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत केरळवासीयांपर्यंत पोहोचवली आहे.

दरम्यान, सुशांतने केलेल्या या मदतीमुळे शुभमने त्याचे मनापासून आभार मानले आहेत.सुशांतपूर्वी अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनीही केरळच्या पुरग्रस्तांना मदत केली आहे.