अभिनेता सुशांत सिंह राजपूतच निधन होऊन आता एक आठवडा उलटला आहे. मात्र तरीदेखील त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्याला कायम स्मरणात ठेवण्यासाठी, आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी आजही त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर फॉलो करणं सोडलेलं नाही. त्यामुळेच या चाहत्यांसाठी सुशांतच्या कुटुंबीयांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानुसार, सुशांतच्या निधनानंतरही त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु राहणार आहे.

सुशांतच्या निधनानंतर त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सुशांतवर चाहते करत असलेलं हे प्रेम पाहून त्याच्या कुटुंबीयांनी हे अकाऊंट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सुशांतचे कुटुंबीय लिगेसी अकाऊंटद्वारे सुशांतचं इन्स्टाग्राम सुरु ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत या नावाने एका फाऊंडेशनची स्थापना करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

“तुमच्यासाठी सुशांत सिंह राजपूत आणि आमच्यासाठी आमचा एकुलता एक मुलगा. मोकळ्या मनाचा, बडबडा आणि हुशार. प्रत्येक गोष्टीविषयी वाटणारं कुतुहल, प्रत्येक नव्या गोष्टीसाठी उत्सुक. मोठ-मोठी स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्याची हौस. जेव्हा हसायचा तेव्हा खळखळून हसायचा. घरातल्या मोठ्यांचा अभिमान होता, तर लहानग्यांचा आदर्श. एक दुर्बणी कायम जवळ असायची त्याच्या शनि ग्रह पाहण्याची फार आवड होती त्याला. आता त्याचं ते खळखळून हसणं पुन्हा कधीच आमच्या कानावर पडणार नाही, हे पचनी पडायला आम्हाला कित्येक वर्ष लागतील. विज्ञानाविषयी प्रत्येक गोष्ट सांगण्याची त्याची धडपड, उत्सुकता आता परत कधीच आम्हाला पाहायला मिळणार नाही. घरात कधीही न भरता येणारी पोकळी तो निर्माण करुन गेला आहे. या विचारांनीच आम्ही सगळे स्तब्ध झालो आहोत”, अशी पोस्ट सुशांतच्या कुटुंबीयांनी शेअर केली आहे.

पुढे ते म्हणतात, “त्याच चाहत्यांवर प्रचंड प्रेम होतं. तुम्ही सुद्धा आमच्या मुलांवर जे प्रेम केलं, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. आता तो आपल्यासोबत नाहीये म्हणूनच त्याच्या आठवणी जतन करण्यासाठी आम्ही सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना करणार आहोत. या फाऊंडेशनच्या अंतर्गत आम्ही त्याला आवडत असलेल्या कलाविश्व, विज्ञान, आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये करिअर करणाऱ्या गरजुंना मदत करणार आहोत. तसंच पाटणामधील त्याच्या घरात सुशांतचं स्मारक उभारण्यात येणार असून येथे त्याच्या काही आवडत्या वस्तूंचा संग्रहदेखील करण्यात येणार आहे. यात त्याची पुस्तके, दुर्बिणी, फ्लाइट सिम्युलेटर, गिटार, फर्निचर यांसारख्या काही गोष्टींचा समावेश असेल. तसंच सुशांतचे असंख्य चाहते होते. त्यामुळे सुशांत आणि त्यांच्यातील प्रेम असंच कायम ठेवण्यासाठी आम्ही त्याचं इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटदेखील लिगेसी अकाऊंटप्रमाणे सुरु ठेवणार आहोत.

दरम्यान, सुशांतने १४ जून मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मात्र त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.