काही काळापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर MeTooचे आरोप केले होते. तनुश्रीनंतर #MeToo या मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडली. यात अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली होती. त्यातच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावाचादेखील समावेश करण्यात आला होता. सुशांतने ‘दिल बेचारा’ चित्रपटातील सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. यावर आता संजनाने मौन सोडलं असून सत्य परिस्थिती सांगितली आहे. ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ‘सुशांतविषयी त्या केवळ अफवा होत्या’, असं तिने सांगितलं आहे.

“सुशांतने माझ्यासोबत गैरवर्तन केलं अशी माहिती सगळीकडे पसरली होती, त्यावेळी सुशांतला खूप त्रास झाला होता. केवळ त्यालाच नाही तर मला सुद्धा या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप झाला होता. कारण त्यावेळी सत्य काय आहे हे फक्त आम्हा दोघांनाच माहित होतं. आमच्यातली मैत्री कशी आहे हेदेखील केवळ आम्हालाच माहित होतं. त्या मैत्रीचं महत्त्व आम्हाला माहित होतं. परंतु,आम्ही सेटवर केल्यावर रोज असे १-२ आर्टिकल्स यायच्याचे”, असं संजना म्हणाली.


पुढे ती म्हणते, “सुशांत आणि माझ्याविषयी रोज नवनवीन चर्चा रंगत होती. परंतु, आम्ही कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आमची मैत्री कायम ठेवली आणि त्याच्यावर जे आरोप करण्यात आले होते, तसं आमच्यात काहीच झालं नव्हतं. माहित नाही पण अशा गोष्टींची चर्चा का होऊ लागली आणि त्याच्यावर आरोप करण्यात आले. आम्ही सतत हाच विचार करायचो की लोकांना कसं समजवायचं की आमच्यात सगळं ठीक आहे. या सगळ्या अफवा आहेत. त्यावेळी एक वेगळीच परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झाली होती”.

दरम्यान,  येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.