बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला. आता हा चित्रपट न्यूझीलंडमधील एका चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

न्यूझीलंडमधील हिंदी रेडीओ चॅनेल ऑकलंड येथील होयत्स चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. तसेच न्यूझीलंड हा पहिला देश ठरला आहे जेथे सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच तेथील चाहत्यांनी सुशांतला श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

भारतात करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिले आहे.

सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी डिझनी प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला आहे. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आला.