फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरने नावात बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यातच एक माहिती अशीही समोर येत आहे की, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतलाही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने ती करण्यास साफ नकार दिला होता.

सुशांतला तब्बल १५ कोटी रुपयांच्या जाहिरातीची ही ऑफर होती. वर्णावरून लोकांमध्ये कुठलाही चुकीचा संदेश पोहोचू नये म्हणून त्याने ही ऑफर धुडकावली होती. मूल्यांच्या विरोधात जाऊन कोणतंही काम करणार नाही, यावर तो ठाम होता. त्यामुळे त्याच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे. सुशांतने १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टी, फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सुशांतप्रमाणेच कंगना रणौत, अनुष्का शर्मा, अभय देओल, प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, रणबीर कपूर, रणदीप हुड्डा यांसारख्या कलाकारांनीदेखील फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींना साफ नकार दिला होता.

गोरं होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने वारंवार फेअर अॅण्ड लव्हली ब्रॅण्डवर टीका झाली आहे. जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीकाही वारंवार झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी याच कारणामुळे याची जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. त्यामुळे अखेर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.