अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या शाळेतल्या एका मित्राने त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. सायकल शर्यतीपासून, शाळेत असताना दुसऱ्यांना शिकवण्यापर्यंत अनेक आठवणींना अतुल मिश्राने या पोस्टद्वारे उजाळा दिला आहे. त्याचसोबत त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवरही निशाणा साधला आहे. स्टारकिड्सने भरलेल्या या इंडस्ट्रीने सुशांतला कधी जवळ केलंच नाही, अशा शब्दांत त्याने टीका केली आहे.

“तुझ्याबद्दल जेव्हा कधी मी विचार केला, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर बॉलिवूडचा कोणी स्टार नाही आला. तर सतत संकटांना सामोरं जाणारा एक उंच मुलगा दिसला. तू खूप चांगला मित्र होतास. मला आपली सायकल शर्यत आठवतेय, माझ्या घरी आपण घेतलेले ट्युशन्स मला आठवतायत. माझी आई तुझ्यासाठी खास पदार्थ बनवायची. तुझ्या डोळ्यांतील कृतज्ञता आजही मला आठवतेय”, या आठवणी त्याने सांगितल्या.

आणखी वाचा : “एकमेकांची उणीधुणी नंतर काढा सर्वात आधी…”; विवेक ओबेरॉयने इंडस्ट्रीला सुनावलं

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका करत त्याने पुढे लिहिलं, “तुला ज्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या त्या बॉलिवूड माफियाने बोलायला भाग पाडलं. स्टार किड्सने भरलेल्या या इंडस्ट्रीमध्ये तुला परक्यासारखं वागवलं गेलं. तु ज्या यशासाठी पात्र होतास, ते तुझ्याकडून हिरावून घेण्यात आलं. शाळेत असताना तू अनेकदा चुकीच्या गोष्टींविरोधात उभा राहिलास. आपण संपर्कात असतो तर कदाचित आज हे घडलं नसतं. घराणेशाहीत बुडालेल्या इंडस्ट्रीविरोधात आपण दोघांनी एक शेवटचा लढा दिला असता.”

रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पण नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे.