सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दु:खातून त्याचे कुटुंबीय अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे सुशांतची बहीण अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतच्या आठवणींना उजाळा देत असते. यामध्येच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुशांतच्या बहिणीने राणीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

२५ वर्षांनंतर आजही सगळं तसंच आहे फक्त तुझा चेहरा समोर नाही असं म्हणत राणीने तिच्या अश्रूंना वाट मोकळी केली आहे. सुशांतच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर कोसळेलं दु:ख या पोस्टमधून दिसून येत आहे.

माझं बाळ. आज माझा दिवस आहे. आज तुझा दिवस आहे. आज आपला दिवस आहे..आज रक्षाबंधन आहे. पस्तीस वर्षानंतर हा पहिला असा दिवस आहे, जेव्हा आरतीचं ताट सजलं आहे, औक्षणाकरता दिवा आहे. हळद- चंदनाचं गंध आहे आणि गोड पदार्थ सुद्धा आहेत. आज रक्षाबंधन आहे. पण.. तोच चेहरा नाही ज्याला मी औक्षण करु शकते, तो हात नाही ज्याच्या मनगटावर मी राखी बांधू शकते ते ओठ नाहीत ज्यांना मी गोड पदार्थ भरवू शकते. तो भाऊ नाही ज्याला मी मीठी मारु शकते, अशी पोस्ट राणीने शेअर केली आहे.

पुढे ती म्हणते, तुझा जन्म झाल्यानंतर सगळं जीवन आनंदाने भरुन गेलं होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण आता तू नाहीस तर सुचत नाही मी काय करु. तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे. कधीच वाटलं नव्हतं असाही दिवस पाहावा लागेल. रक्षाबंधन असेल पण तू नसशील हा विचारच करवत नाही. तुझ्यासोबत अनेक गोष्टी शिकल्या मग आता तुझ्याशिवाय जगायचं कसं शिकू? तुच सांग.

दरम्यान, नीतू सिंग म्हणजे सुशांतची राणी दी यांनी लिहिलेल्या या पोस्टमुळे अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. राणी दीप्रमाणेच सुशांतची दुसरी बहीण श्वेता सिंग किर्तीनेदेखील अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.