अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डिप्रेशनमुळे त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे दावे व आरोप करण्यात आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, यश राज फिल्म सोबत सुशांतनं केलेल्या कराराचे कागदपत्र मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.

सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर त्याला मानसिक त्रास दिला गेल्याचे आरोपही करण्यात आले होते. या अनुषंगाने राज्य सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून, मुंबई झोन ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तपासासंदर्भात माहिती दिली. “वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याकडील व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूतने यश राज फिल्मसोबत केलेल्या कराराचे कागदपत्रेही तपास करत असलेल्या अधिकाऱ्याला मिळाली आहेत. या प्रकरणात १५ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत,” अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेनंतर अनेक धक्का बसला. त्याचबरोबर काही जणांनी त्यांच्या आत्महत्येविषयी संशयही व्यक्त केला. त्यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरही प्रचंड टीका सुरू झाली आहे. त्याचबरोबर सुशांतवर असं पाऊल उचलण्यासाठी दबाब आणला गेला. त्याला मानसिकरीत्या तसं बिंबवलं गेलं, असा आरोपही सिनेसृष्टीतील काहीजणांनी केला होता. विशेषतः अभिनेत्री कंगना राणावतनं सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती.