कलाकारांना समाजाचा आरसा समजले जाते. अनेकजण त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला प्रेरणास्थानही मानण्यास कमी करत नाहीत. त्यामुळे कलाकारांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम समाजावरही दिसून येतो. त्यातीलच एक भाग म्हणजे सेलिब्रिटी करत असलेल्या जाहिराती. सेलिब्रिटी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर ते उत्पादन चांगलेच असणार असे समजून सामान्य लोक ते उत्पादन विकतही घेतात. मात्र, गेल्या वर्षात फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींमुळे बरेच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्वचेचा रंग उजवळण्यासाठी अमुक फेअरनेस क्रीम, फेसवॉश किंवा पावडर वापरा अशा बराच जाहिराती आपण पाहतो. या जाहिरातींच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी कलाकाराच मुख्यत्वे पाहायला मिळतात. शाहरुख खान, सोनम कपूर, हृतिक रोशन, सुशांत सिंह राजपूत आणि अन्य काही कलाकारांनी आजवर फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्या आहेत. पण अशा जाहिराती करून आपण समाजाची दिशाभूल करतोय याची जाणीव कदाचित अभिनेता सुशांत सिंह राजपूतला झाली असल्याचे दिसते.

वाचा : मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा खलनायक

अभिनेता अभय देओलने काही महिन्यांपूर्वी फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींना विरोध केला होता. फेसबुकवर त्याने फेअरनेस क्रीमच्या जाहिराती पोस्ट करत त्या करणाऱ्या कलाकारांना चांगलेच फटकारले होते. यावरून नंतर बराच वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले. अभयनंतर आता सुशांतही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. नुकतीच त्याने फेअरनेस क्रीमची एक जाहिरात नाकारल्याचे कळते. या जाहिरातीसाठी त्याला तब्बल १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

वाचा : ‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’, म्हणतोय ‘आपला मानूस’

अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो. त्यामुळे कलाकार म्हणून आपण अशा गोष्टींचा प्रसार न होण्याची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे सुशांतला वाटते. अखेरचा ‘राबता’ या चित्रपटात दिसलेला हा अभिनेता सध्या ‘ड्राइव्ह’ आणि ‘चंदा मामा दूर के’ चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच तो अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटात सारा अली खानसोबत मुख्य भूमिकेत दिसेल.