बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आतापर्यंत रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय, रियाचा मॅनेजर आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी यांची चौकशी केली आहे. आता ईडीने सुशांतच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सुशांतसोबत काम करताना त्याच्या आर्थिक व्यवहारात किंवा अन्य कुठल्या अनियमितता आढळल्या त्याबद्दल बॉडीगार्डची जबानी नोंदवण्यात येणार आहे.

रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधातील मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह राजपूतची बहिण मीतू सिंहची चौकशी केली. सुशांतचे वडिल के.के.सिंह यांनी पाटण्याणध्ये रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या अकाऊंटमधून १५ कोटी रुपये काढून घेतले तसेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

रिया चक्रवर्तीची ईडीने आतापर्यंत दोनदा चौकशी केली आहे. दरम्यान अभिनेते शेखर सुमन यांनी रियाच्या अटकेची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक पोस्ट करुन रियाच्या विचारसरणीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘युरोप ट्रिपदरम्यान एक पेंटिंग पाहून घाबरला होता सुशांत’
ऑक्टोबर २०१९ मध्ये सुशांत व रिया युरोपला फिरायला गेले होते. या ट्रिपदरम्यान काय घडलं, त्याचा खुलासा रियाने ईडीकडे केला आहे.

‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, रियाने ईडीला सांगितलं की ऑक्टोबर २०१९ मध्ये रिया आणि सुशांत इटलीतील फ्लॉरेंन्स या ठिकाणी फिरायला गेले होते. “फ्लॉरेन्समध्ये आम्ही एका ६०० वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमधील रुम्स फार प्रशस्त होत्या आणि भितींवर विविध पेंटिंग्स लावले होते. त्यातील एका पेंटिंगला पाहून सुशांत फार घाबरला होता. तो अचानक रुद्राक्षची माळा घेऊन जप करू लागला होता. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती खराब होऊ लागली होती”, असं रियाने सांगितलं. रियाचा भाऊ शौविकसुद्धा त्यांच्यासोबत होता.