अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात आवाज उठवला जात आहे. स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान सुशांतचा मेहुणा विशाल किर्ती याने या घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एक ‘नेपोमीटर’ तयार केल्याची घोषणा केली आहे. हा मीटर घराणेशाहीशी दोन हात करेल असा दावा त्याने केला आहे.

विशाल किर्तीने ट्विट करुन या नेपोमीटरची माहिती दिली. विशालचा भाऊ मयुरेष कृष्णा याने हा नेपोमीटर तयार केला आहे. हा मीटर एक प्रकारे बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देण्याचे काम करेल. प्रामुख्याने घराणेशाहीच्या आधारावर हा मीटर बॉलिवूड चित्रपटांची रेटिंग ठरवेल. असं विशाल किर्ती याने सांगितलं आहे. सध्या या मीटरवर काम सुरु आहे. येत्या काळात त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.