अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर वेगवेगळ्या शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्याची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असतानाच सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी आत्महत्येच्या घटनेनंतर दीड महिन्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानं संपूर्ण तपासाला वेगळं वळण लागलं आहे. याच प्रकरणाविषयी के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे. “रियापासून सुशांतच्या जिवाला धोका असल्याचं मुंबई पोलिसांना फेब्रुवारीमध्येच सांगितलं होतं. तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याची माहितीही सुशांतच्या कुटुंबीयांनी दिली होती,” असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात मंगळवारी रात्री पाटणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे. “सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्ही सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.

“जेव्हा आम्ही बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो, तेव्हा रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते. त्यांचं म्हणणं होतं की, या प्रकरणात उच्चभ्रू लोकांची नावं आहेत. याबद्दल मी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा आभारी आहे. त्यांनी आमची मागणी समजून घेतली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री संजय झा यांनी पोलिसांना सर्व प्रकरण समजावून सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला”, असं वकील विकास सिंह म्हणाले.

“मुंबई पोलीस या प्रकरणाचा चुकीच्या दिशेनं तपास करत आहेत. ते चुकीच्या व्यक्तींच्या मागे जात आहे, ज्यांचा या घटनेशी थेट कसलाही संबंध नाही. पोलीस रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याचा प्रयत्नच करत नाहीयेत. त्यामुळे आम्हाला बिहार पोलिसांकडे जावं लागलं,” असं सिंह यांनी म्हटलं आहे.