अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असतानाच सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांसोबतच पटना पोलिसांनी देखील सुरु केली आहे. दरम्यान या प्रकरणावर के. के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव

आज तकला दिलेल्या मुलाखतीत विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीवर संशय व्यक्त केला. “मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ३८ लोकांची चौकशी केली पण या चौकशीतून काहीही साध्य झालेलं नाही. ही मंडळी फक्त मोठ्या उद्योजकांना चौकशीसाठी बोलावतायत पण सुशांतच्या आसपास असलेल्या लोकांची चौकशी अद्याप झालेली नाही. पोलिसांना इतकं सांगूनही त्यांनी ३०६ कलमाखाली अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला नाही. कदाचित मुंबई पोलिसांना या केसला घराणेशाहीच्या दिशेने वळवून दाबायचे आहे. त्यामुळेच सीबीआयसाठी ते नकार देत आहेत. परंतु आम्ही या केसमधील खरा गुन्हेगार शोधून काढूच.” असे आरोप विकास सिंह यांनी केले आहेत.

मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जात आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी, भाजपा खासदार निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सूमन तसंच रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्रही लिहिलं होतं.