अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही दिले आहेत. कोर्टाच्या या निकालामुळे सुशांतच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान सुशांतच्या कुटुंबियांनी ‘युनायडेट फॉर जस्टिस’ असं एक ट्विटर अकाउंट सुरु केलं आहे. सुशांतच्या चाहत्यांनी एकत्र यावं यासाठी या अकाउंटची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत १२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या पेजला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच या अकाउंटवर एक पत्रक पोस्ट करण्यात आलं. या पत्रकाद्वारे सुशांतच्या कुटुंबियांनी सर्व चाहत्यांचे आणि माध्यमांचे आभार मानले आहेत. “सुशांतच्या सर्व चाहत्यांचे, मित्रमंडळींचे आणि माध्यमांचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला भक्कम पाठिंबा दिलात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे देखील आभार तुमच्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. आम्हाला खात्री आहे आता खरे गुन्हेगार लवकरच जगासमोर येतील.” अशा आशयाचा मजकुर या पत्रकामध्ये आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला.