भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. छातीत दुखू लागल्याने सुषमा स्वराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर आणि जनतेच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर सगळीकडे शोक व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना आदरांजली वाहिली असून अभिनेता रितेश देशमुख याने सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

२००३ मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भूमिका असलेला ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये रितेश आणि जेनेलिया या दोघांची मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे ज्यावेळी २००१ मध्ये या चित्रपटाचं रामोजी फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरु होतं. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी या दोघांची भेट घेतली होती. या आठवणींना रितेशने ट्विटरच्या माध्यमातून उजाळा दिला असून एक पोस्ट शेअर केली आहे.

‘२००१ मध्ये माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीचा योग आला होता. त्या रामोजी फिल्मसिटीमध्ये आल्या होत्या. तिथे माझा आणि जेनेलियाचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. यावेळी सुषमा स्वराज यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला यश मिळावं यासाठी प्रार्थना केली होती. त्यावेळी कलाविश्वात आम्ही नवीनच होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहित केलं होतं. धन्यवाद सुषमा स्वराज मॅडम’, असं ट्विट रितेशने केलं आहे.

दरम्यान, भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे त्यांचे ट्वीट अखेरचे ठरले. त्यात त्यांनी ‘मोदीजी धन्यवाद. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहात होते,’ असे नमूद केले होते.