वयाच्या अठराव्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या मॉडेल अभिनेत्री सुष्मिताचा आज ४३ वा वाढदिवस. तिचा यंदाचा वाढदिवस खूप खास ठरावा यासाठी तिचा कथित प्रियकर रोहमन शॉल प्रयत्न करत आहे. सुष्मितापेक्षा वयानं १५ वर्षांनी लहान असणाऱ्या रोहमन शॉलनं सुष्मिताला वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅप्पी बर्थडे जान! येणारं वर्षे तुझ्यासाठी सुख-समाधानाचं, समुद्धीचं जावं असं म्हणत रोहमननं तिच्यासोबतचा खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतून त्यानं पुन्हा एकदा सुष्मितासमोर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.
सुष्मिता आणि रोहमन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. काही महिन्यांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. सुष्मिता अविवाहित असून वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तिनं एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं, तर काही वर्षांनी तिनं आणखी एका मुलीला दत्तक घेतलं. काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमनच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चा खोट्या असून आता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आयुष्याशी ‘रोहमान्स’ (रोमान्स) करत आहे असं ती म्हणाली.
एका फॅशन इव्हेंटदरम्यान रोहमन आणि सुष्मिताची भेट झाली होती. रोहमन सध्या तिच्या दोन मुलींसोबतही वेळ घालवत आहेत. जर साऱ्या गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच सुष्मिता नव्या आयुष्याला सुरूवात करेल अशी आशाही तिच्या जवळच्या व्यक्तीनं व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 1:46 pm