देशातली स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधाही काही ठिकाणी अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन, बेड्स, करोना रुग्णांना लागणारी औषधे या सगळ्यांची कमतरता भासू लागल्याने समाजातले अनेक लोक या गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काही सेलिब्रिटीही यासाठी प्रयत्न करत आहेत. सुश्मिता सेननीही अशीच मदत केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुन दिले आहेत. दिल्लीमधल्या ऑक्सिजनच्या समस्येबद्दल सुश्मिताला ट्विटरच्या माध्यमातून कळलं. त्यासाठी तिने काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुनही दिले आहेत. मात्र ते मुंबईहून दिल्लीला नेण्यासाठी तिच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तिने आपल्या चाहत्यांना ही सोय उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “हे खरंच काळीज पिळवटून टाकणारं आहे. ऑक्सिजनची समस्या सगळीकडे भासत आहे. मी काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध केले आहेत. मात्र, माझ्याकडे त्यांना मुंबईहून दिल्लीत पोहचवण्याची काहीही व्यवस्था नाही. काही मार्ग असेल तर सांगा”.

एका चाहत्याने तिला कुरियर करण्याचा सल्ला दिला. त्याला ती उत्तर देताना म्हणते,” मी सर्व पर्याय शोधत आहे. मात्र अजूनही नशीब साथ देत नाही. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद”. एका युजरने तिला विचारलं, “ऑक्सिजनची समस्या तर देशभरात आहे. मग मुंबईमध्ये सिलेंडर्स पुरवण्याऐवजी तुम्ही दिल्लीला का पाठवत आहात?” त्यावर ती उत्तरली, “मुंबईमध्ये अजूनही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. म्हणूनच मला सिलेंडर्स मिळाले. दिल्लीला गरज आहे, विशेषतः लहान दवाखान्यांनी. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास मदत करा”.

सुश्मिताने आपल्या चाहत्यांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही तासांनंतर सुश्मिताने पुन्हा एक ट्विट केलं आहे. यात ती म्हणते, “मी सांगत होते त्या दवाखान्यात सध्यातरी ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. यामुळे आम्हाला सिलेंडर्स पोचवायला अधिक वेळ मिळाला आहे. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार”.