25 April 2019

News Flash

गूढ मालिकांचे ग्रहण

मराठी ललित साहित्यातून आजवर अशा गूढ-अतक्र्य गोष्टींचे दर्शन वाचकांना घडले होते

गूढ आणि अतक्र्य गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे आणि यापुढेही ते वाटत राहील. बुद्धी आणि विज्ञानाच्या जे पलीकडे आहे आणि आपल्याला ज्याची उत्तरे मिळत नाहीत त्याची उत्तरे मिळविण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. अशा गोष्टींविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल, भीती, उत्सुकता असे सर्व काही असते. नारायण धारप यांच्या ‘ग्रहण’ कादंबरीवरून प्रेरित ‘ग्रहण’ ही नवी मालिका नुकतीच ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झाली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘हंड्रेड डेज’ या मालिकांप्रमाणे रात्री साडेदहाची वेळ ‘झी मराठी’ने गूढ, रहस्यमय अशा मालिकांसाठीच बहुधा राखून ठेवली आहे. मराठी ललित साहित्यातून आजवर अशा गूढ-अतक्र्य गोष्टींचे दर्शन वाचकांना घडले होते, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही यापूर्वी अशा गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा टक्का हा तुलनेने कमीच आहे.

‘झी मराठी’वर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून तोच खेळ पुन्हा एकदा वेगळ्या रूपात पाहायला मिळाला होता. ‘हंड्रेड डेज’च्या निमित्तानेही प्रेक्षक ‘मर्डर मिस्ट्री’ प्रकारात गुंतले. सुरुवातीला या दोन्ही मालिकांनी उत्सुकता निर्माण केली पण शेवटी प्रेक्षकांची निराशा आणि अपेक्षाभंग झाला. खरे तर दोन्हीकडे ते झालेले खून आणि त्याची केलेली उकल हे वेगळ्या प्रकारे सादर करता आले असते. पण ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये नीलिमा हे पात्र ‘होय, मीच हे सर्व खून केले आहेत’, असे सांगते आणि मालिका संपते. तर ‘हंड्रेड डेज’मध्येही अनंत जोग यांचा प्रवेश झाल्यानंतर मालिकेला वेगळे वळण देता आले असते. पण काही भागांतच त्यांना गायब करण्यात आले. डोंगर पोखरून उंदीर काढला, अशी टीका या दोन्ही मालिकांवर झाली. त्या तुलनेत ‘झी युवा’ वाहिनीवर सादर झालेली ‘रुद्रम’ ही मालिका उजवी ठरली. सुरुवातीपासूनच या मालिकेने खिळवून ठेवले आणि प्रेक्षकांना ही मालिका हवी हवीशी वाटत असतानाच मालिकेने पूर्णविराम घेतला. ‘रुद्रम’ मालिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरण या सर्वच बाबतीत प्रेक्षकांची पकड घेणारी ठरली. रत्नाकर मतकरी यांच्या कथांवर आधारित ‘गहिरे पाणी’, नारायण धारप यांच्याच कथांवर आधारित ‘अनोळखी दिशा’ या मालिकाही गाजल्या. सर्वच बाबतीत त्या कसदार होत्या.

नेहमीच्या पठडीपेक्षा अशा गूढ, रहस्यमय, भय मालिकांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग मराठीत तयार होत आहे ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. पण अपवाद वगळता अशा विषयांवरील मराठी मालिकांकडून योग्य तो दर्जा राखला जात नाही. रात्रीची वेळ, करकर वाजणारा दरवाजा, बीभत्स चेहरे, पांढऱ्या साडीत फिरणारी बाई, कुत्र्यांचे भेसूर रडणे, वटवाघूळ आणि गूढ पाश्र्वसंगीत म्हणजे गूढ, भय मालिका नाही. प्रेक्षकांनाही हे पाहायचे नसते. पण गूढ, भयकथा म्हणून अनेकदा हे असले काहीतरी प्रेक्षकांच्या माथी मारले जाते. आत्मा, भूत-प्रेत, पिशाच्च, मरणानंतरचे जीवन, जादूटोणा, मंत्र-तंत्र, काळी विद्या, भानामती, करणी असे शब्द खरे तर सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडले. काही अपवाद सोडले तर बाकीच्यांना हा विषय माहिती असण्याची शक्यता नाही. अशा गोष्टी आपल्याकडे यापूर्वी मराठी साहित्यातून येऊन गेल्या आहेत. विशेषत: कोकणच्या पाश्र्वभूमीवरील कथा, कादंबरी, नाटक आदी साहित्य प्रकारांतून याला आपण सामोरे गेले आहोत. जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, श्री. ना. पेंडसे आदी लेखकांच्या साहित्यातून याचे प्रतिबिंब उमटले आहे. रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथांची मोहिनी आजही आत्ताच्या तरुण पिढीवर आणि विद्यार्थ्यांवर आहे.

या गूढ, भयकथा आपण पुस्तकातून वाचतो तेव्हाही आपल्या अंगावर कधीतरी सर्रकन काटा उभा राहतो. मनाच्या एका कोपऱ्यात ‘ते’ खरे असेल का, असाही प्रश्न उभा राहतो. हेच जेव्हा दृक्श्राव्य माध्यमातून छोटय़ा पडद्यावर सादर होते तेव्हा ते अधिक प्रभावी ठरते. अशा प्रकारच्या मालिकांमधून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, ‘अशा’ गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये, मालिका पाहून कोणाही बुवा-बाबाच्या नादी लागू नये, मालिकेत जे दाखवण्यात येते ते सर्व काल्पनिक आहे, असे जरी सांगितले जात असले तरीही सर्वसामान्य प्रेक्षक त्यात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो. याचे कारण म्हणजे गूढ आणि अतक्र्य गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. त्याचे चित्रण प्रेक्षक पडद्यावर पाहतात तेव्हा ते त्याच्याशी समरस होतात. आपल्या जीवनात घडलेले प्रसंग किंवा आलेल्या एखाद्या अनुभवाशी त्याची तुलना केली जाते. आणि मग दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेली मालिका, त्यातील पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागतात. मुळात अशा विषयांची आवड किंवा कुतूहल असल्याने प्रेक्षकवर्ग आपोआपच या मालिकांकडे खेचला जातो.

अर्थात, केवळ विषय गूढ आणि भुताखेतांचा आहे म्हणून ती मालिका लोकप्रिय होते असे नाही. तर मालिकेची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, तांत्रिक बाबी आणि अभिनय हेही तितकेच कसदार असावे लागते. हे सगळे जुळून आले तरच ती मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटतेच वाटते. प्रेक्षकही मालिकेत गुंततात. ‘रुद्रम’ मालिका भय किंवा गूढ कथा प्रकारातील नसली तरी मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. ‘गहिरे पाणी’, ‘असंभव’ या मालिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुढे गुंडाळली गेली आणि मालिकेची पकड कमी झाली. मालिकेतील एकही कलाकार माहितीचा किंवा ओळखीचा नव्हता, तरीही मालिका, त्यातील सर्व पात्रे लोकप्रिय झाली हे त्या मालिकेच्या सर्व संबंधित विभागांचे व चमूचे सांघिक यश म्हणावे लागेल.

दूरचित्रवाहिन्यांवरून सादर होणाऱ्या मालिकांचाही उद्देश समाजात अंधश्रद्धा किंवा ‘अशा’ गोष्टी खऱ्याच आहेत, असे सांगणारा नसतो. तशा आशयाची पाटीही मालिकेच्या सुरुवातीला दाखविली जाते. पण असे असले तरी मानवी मनाला ‘अशा’ गोष्टींचे आणि विषयाचे कुतूहल आहे, तोपर्यंत ‘अशा’ मालिका सुरू राहणार, त्या लोकप्रिय होणार आणि ‘अशा’ गोष्टी खऱ्या की खोटय़ा त्यावर चर्चा व वादही होतच राहणार. मराठीत गूढ, भय किंवा रहस्यमय विषयांचीच मांडणी असलेल्या मालिका सादर झाल्या असल्या तरीही अन्य विषयांवरील मालिकांच्या तुलनेत अशा विषयावरील मालिकांचे प्रमाण कमीच आहे. किंवा अन्य मालिकांप्रमाणे या मालिकांचे पर्व दुसरे, तिसरे असे अद्याप तरी पाहायला मिळालेले नाही.

काही भयप्रद भूतकाळातील..

  • श्वेतांबरा- मुंबई दूरदर्शन केंद्रावरून सादर झालेली ‘श्वेतांबरा’ ही या विषयावरील पहिली मराठी मालिका म्हणता येईल. गूढ, रहस्यमय असलेल्या या मालिकेने त्या काळात प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
  • गहिरे पाणी- रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथा नेहमीच वाचकांना आकर्षित करतात आणि खिळवून ठेवतात. मतकरी यांच्या कथेचा शेवटही नेहमीच धक्कादायक असतो. मतकरी यांच्याच गूढ कथांवरील ‘गहिरे पाणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. जे वाचले ते प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळाले होते.
  • अनोळखी दिशा- नारायण धारप हे नाव गूढ, रहस्यमय कथाविषयांशी जोडले गेले आहे. धारप यांच्या कथा-कादंबऱ्यांना आजही ग्रंथालयातून वाचकपसंती आहे. धारप यांच्या कथांवर आधारित ‘अनोळखी दिशा’ या मालिकेची निर्मिती अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केली होती. या मालिकेनेही आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.
  • असंभव- मराठीतील दिग्गज कलाकार असलेली ‘असंभव’ ही मालिकाही अशीच गूढ व रहस्यमय होती. या मालिकेत पुनर्जन्माचा विषय हाताळण्यात आला होता. मालिकेतील ‘सोपान आजोबा’, ‘सुलेखा’, ‘तनिष्का’ आदी पात्रे लोकप्रिय झाली होती. एवढेच नाहीतर गूढ विषय असूनही दीर्घकाळ चाललेली अशी ही मालिका म्हणता येईल.
  • एक तास भुताचा- ‘मी मराठी’ वाहिनीवरून ‘एक तास भुताचा’ ही मालिका काही वर्षांपूर्वी प्रसारित झाली होती. मालिकेत भूत, प्रेत, आत्मा, जादूटोणा, काळी विद्या असे विषय होते.

First Published on April 1, 2018 2:28 am

Web Title: suspense marathi serials issue mysterious marathi serials