17 October 2019

News Flash

भंपक, तोकडा प्रयत्न

सध्या सगळीकडे बाबा, स्वामी अशा लोकांचे प्रचंड पेव फुटलेले आपल्याला दिसते. लोकांचे लोंढेच्या लोंढे या बाबा-स्वामी यांसारख्या तत्सम व्यक्तींच्या भजनी लागतात आणि मग एक दिवस

| November 30, 2014 06:57 am

सध्या सगळीकडे बाबा, स्वामी अशा लोकांचे प्रचंड पेव फुटलेले आपल्याला दिसते. लोकांचे लोंढेच्या लोंढे या बाबा-स्वामी यांसारख्या तत्सम व्यक्तींच्या भजनी लागतात आणि मग एक दिवस त्यांचा फुगा फुटला की मगच ताळ्यावर येतात. अशा घटना मोठय़ा प्रमाणावर घडताना दिसत आहेत. अशा बाबा-स्वामींवर टीका करण्याचा एक तोकडा प्रयत्न दिग्दर्शकाने ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या चित्रपटातून केला आहे.
स्वामी-बाबांचे मठ उभारून त्याभोवती सगळे अर्थकारण फिरवत स्वत:ची धन करणाऱ्या एका कॉपरेरेट टोळक्याचा पर्दाफाश करण्याचा दिग्दर्शकाचा उद्देश आहे किंवा असे बाबा-स्वामी निर्माण कसे होतात हे दाखविण्याचा प्रयत्न यातून दिसतो. परंतु, हे दाखवताना मध्यांतरानंतर चित्रपट भलत्याच वळणावर गेल्यामुळे दिग्दर्शकाचा प्रयत्न प्रामाणिक होता का असा संशय प्रेक्षकाला येतो. सुरुवातीची मांडणी चांगली करून त्यासाठी उत्तम कलावंतांची साथ मिळूनही अपेक्षित परिणाम चित्रपटात साधलेला नाही.
एमएसडब्ल्यू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सिद्धार्थ या तरुणाचा आशावादी दृष्टिकोन हेरून गडगंज पैसे कमावण्याची कल्पना नचिकेतला सुचते. लोकांचा भोळेभाबडेपणा हेच भांडवल मानून एक तोतया स्वामी ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या कंपनीतर्फे तयार केला जातो. मग त्याभोवती लोकांचे कोंडाळे, मठ, अनेक उपक्रम, स्वामींच्या फोटोंची विक्री अशी जमेल त्या सर्व मार्गाने धन करण्याचा धंदा नचिकेत चालवतो. त्यामध्ये सिद्धार्थ हा स्वामी बनलेल्या तरुणासह त्याची प्रेयसी सायली, एका गावचा पाटील आणि राजकारणी भाऊ यांची नचिकेतला साथ मिळते आणि एक उद्योग उभा राहतो, या मुख्य स्वामी उद्योगावर पोट भरणाऱ्या लोकांची संख्याही तेवढीच वाढत जाते. स्वामी पब्लिक लिमिटेडचा भाव शेअर बाजारात वधारत राहतो. राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू यांच्यापासून ते मोठय़ा प्रमाणावर बहुभाषिक लोक स्वामी मठाच्या कच्छपी लागतात. हे आजच्या काळातील वास्तव दिग्दर्शकाने मांडण्याचा प्रयत्न केला असून चित्रपटाची मूळ कल्पना चांगली आहे. सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, नवोदित अभिनेत्री संस्कृती खेर, दिवंगत विनय आपटे, विक्रम गोखले अशी कलावंतांची उत्तम फळी यात आहे. परंतु, बेगडी स्वामी, त्याच्या अवतीभवतीच्या तितक्याच बेगडी लोकांची पिलावळ यांची मांडणी दिग्दर्शकाने तितक्याच बेगडी, तकलादू पद्धतीने केली आहे. वास्तविक सध्याच्या काळात हे बाबा-स्वामींचे प्रस्थ कसे निर्माण होते, कशामुळे निर्माण होते, त्यासाठी कोणत्या गोष्टींना खतपाणी घातले जाते हा गंभीर विषय खरेतर मांडणे अपेक्षित होते. आजच्या काळाला सुसंगत असा विषय चित्रपटकर्त्यांनी निवडला खरा. परंतु, त्याचे चित्रण करताना बाबा-स्वामी लोकांचा पर्दाफाश मुळापासून करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने चित्रपटातून केलेला नाही. एकदा अचानक स्वामी बनलेला सिद्धार्थ पलायन करतो आणि चित्रपटाच्या शेवटी परत मठात येतो. याची कारणमीमांसा केलेली नाही. त्यामुळे चित्रपटातून अशा स्वामी-बाबांच्या बोकाळलेल्या व्यवस्थेवर मोघम टीका करण्यापलीकडे लेखक-दिग्दर्शकाची मजल जात नाही. त्यामुळे बेगडी स्वामीचा हा तितकाच बेगडी-भंपक चित्रपट ठरतो.  

स्वामी पब्लिक लिमिटेड
निर्माती – पूनम शेंडे
लेखक-दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे
संगीत – उत्तम सिंग
छायालेखन – विक्रम अमलाडी
कलावंत – चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, स्व. विनय आपटे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, नवतारका संस्कृती खेर, विनोद खेडेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे, सविता मालपेकर व अन्य.

First Published on November 30, 2014 6:57 am

Web Title: swami public ltd marathi movie
टॅग Marathi Movie