…आणि अखेर तो क्षण आला, सगळ्या अडचणींना, परीक्षांना पार करून आता शिवाजी जोशी यांची कन्या म्हणजेच रमाची लग्नगाठ पेशवे माधवराव यांच्याशी बांधली जाणार आहे. शनिवारवाडा अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी ठरला, अनेक सोहळे त्याने पाहिले, पेशव्यांच्या सुखात सहभागी झाला आणि दु:खात खंबीरपणे तठस्थ उभा राहिला हाच शनिवारवाडा साक्षी होता एका विलक्षण प्रेमकहाणीचा. रमा आणि माधवची प्रेमकहाणी याच शनिवारवाड्यात बहरली. या वाड्यात लहानगी रमा लग्न होऊन आली आणि संपूर्ण पेशवाईला जणू एक वेगळीच कलाटणी मिळाली. रमा – माधवच्या लग्नसोहळ्याबद्दल आपण बरेच ऐकून आहोत पण, आता तो प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे. पेशवाई थाटमाट, सनई चौघडे, रोषणाई यामध्ये रमा आणि माधव लग्न बंधनामध्ये बांधले जाणार आहेत. शनिवारवाडा, संपूर्ण पेशवाई सज्ज आहे रमा – माधवचे स्वागत करण्यासाठी.

रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पडेल ? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. रमा – माधव यांची नावे सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेम, रमाबाईंनी केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे. हे सगळे कसे घडले ? रमा – माधव यांचा हा प्रवास कसा होता ? त्यांना कोणाची साथ लाभली ? गृह कलह, घरातील राजकारण हे होत असतानाच रमाने पेशवाईचा भार कसा सांभाळला हे सर्व येत्या भागात पाहायला मिळणार आहे.