दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर राज्य केलं. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर भूमिकेमधूनही त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहेत.लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे रंगमंचावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून स्वानंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालीय. यातच स्वानंदीनं चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आणलीय. स्वानंदीनं तिच्या पहिल्या वहिल्या नाटकाची घोषणा केलीय. सोशल मीडिआवर स्क्रिप्टचा फोटो शेअर करत स्वानंदीनं नाटकाचं नाव जाहीर केलंय. या नाटकाचं नाव खुपच खास आहे. ‘धनंजय माने इथेच राहतात’ असं स्वानंदीच्या नाटकाचं नाव आहे. यात स्वानंदी ‘सौ. माने’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ या गाजलेल्या सिनेमातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा संवाद खुपच लोकप्रिय झाला. अनेक विनोदांमध्ये हा डायलॉग व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. याच नावाचं नाटक मार्च महिन्यात रंगमंचावर नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. स्वानंदीसोबत तिची आई प्रिया बेर्डे यांचीदेखील नाटकात मुख्य आहे भूमिका आहे. राजेश देशपांडे यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘धनंजय माने इथेच राहतात’ हे नवीन नाटक तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. वाट बघा आमच्या येण्याची असं कॅप्शन देत स्वानंदीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.