रंगभूमीवर अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री स्पृहा जोशीने गाजवलेल्या ‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकातील ‘प्रणोती’ची जागा कोणती अभिनेत्री घेणार? याविषयीची उत्कंठा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सर्वांनाच लागून राहिली होती. पण, आता मात्र हा शोध संपला आहे. नाट्यरसिकांच्या मनात घर केलेल्या या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरची निवड करण्यात आली आहे.

विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या २७५ व्या प्रयोगानंतर उमेश- स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदीच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.

प्रेक्षकांच्या उदंड प्रसिसादात पार पडलेल्या प्रयोगाबद्दल सांगाताना ‘प्रणोती’ या भूमिकेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करत स्पृहा म्हणाली ‘या नाटकाचा आज झालेला २७५ वा प्रयोग माझा शेवटचा प्रयोग असून, यापुढे तुम्हाला स्वानंदी टिकेकर माझी भूमिका साकारताना दिसेल. माझ्या काही प्रोफेशनल कमिंट्समेंटमुळे मला हे नाटक सोडावं लागतंय. पण, हे नाटक आजच्या काळाच महत्वाचं नाटक आहे. या नाटकाचा विषय खूप महत्वाचा असल्यामुळे, माझ्या नसण्याने एक चांगला विषय बंद होणं योग्य नाही. त्यामुळे या नाटकाच्या पुढील प्रवासात माझ्या जागेवर स्वानंदी टिकेकर हा नवा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. माझ्या भूमिकेवर जसे भरभरून प्रेम केले अगदी तसेच प्रेम तुम्ही स्वानंदीवर देखील कराल अशी मी आशा करते’.

‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकातील महत्वपूर्ण बदलाबद्दल सांगताना, स्पृहा एक मेहनती अभिनेत्री असून, तिच्यासोबतचा पार केलेला या नाटकाचा दीर्घ प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचं उमेशने सांगितलं. तसंच ‘प्रणोती’च्या भूमिकेत दिसणाऱ्या स्वानंदीबद्दल बोलताना, स्वानंदी हुशार आणि कुशल अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायला आपण खूप उत्सुक असल्याचंही त्याने सांगितलं.

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला ताणतणावर यावर भाष्य करणाऱ्या ‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित, मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश- स्पृहाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे ‘स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला योग्य न्याय देण्याचं आव्हान माझ्यावर आहे. एका गाजलेल्या भूमिकेला कोणत्याही प्रकारचा तडा न लागू देता, त्या भूमिकेत समरसून जाण्याचं काम मला करायचं आहे. त्यासाठी मी विशेष मेहनत घेणार असून, नाटकाच्या पुढील प्रवासात या नव्या प्रणोतीला पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा येतील, याचा मी प्रयत्न करेन’, असं स्वानंदीने सांगितलं.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून रसिकांच्या घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने यापूर्वीच आपल्या अभिनय कौशल्याद्वारे स्वतःचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. शिवाय सुमित राघवनसोबत ‘१०३’ या नाटकाद्वारे तिने रंगभूमीदेखील गाजवली असल्याकारणामुळे, स्वानंदी नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाद्वारे ‘डोण्ट वरी बी हॅपी’ ठेवण्यास नक्कीच यश मिळवेल अशी आशा आहे.