“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत लक्षात ठेवा ही गोष्ट” असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वादग्रस्त वक्तव्य एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलं होतं. या वाक्याचे पडसाद सध्या संपूर्ण देशात उमटत आहेत. या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुप्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांच्यावर काडाडून टीका केली होती. यानंतर आता स्वरा भास्करने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली स्वरा?

“शांत व्हा काका! जर कोणाची मदत करु शकत नसाल तर किमान शांत राहा. अशी मुर्खांसारखी अनावश्यक बडबड करु नका. अशा वक्तव्यांमुळे केवळ चळवळींचे नुकसानच होते.” अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने वारिस पठाण यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते वारिस पठाण?

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.